अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीचा तिढा सुटण्याची चिन्ह दिसत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा पाठोपाठ शिवसेनेनीही या जागेवर दावा सांगितला आहे. आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना रायगड मधून खासदारकीची उमेदवारी देण्याची मागणी युवासेनेनी केली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा गुंता अधिकच वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा असा आग्रह त्यांचा आहे. पण कुठल्याही परिस्थितीत सुनील तटकरे रायगडचे उमेदवार नकोच अशी भुमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मतदारसंघात फारशी ताकद नसतांनाही रायगडची जागा भाजपला मिळावी असा हट्ट त्यांचा आहे. आणि शेकाप मधून भाजपमध्ये आलेल्या आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्षपद संभाळणाऱ्या माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीने लावून धरली आहे. महायुतीच्या दोन पक्षात रायगडच्या जागेवरून खल सरू असतांनाच आता त्यात शिवसेना शिंदे गटाने उडी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “भारतीयांनो आम्हाला माफ करा”, मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांचं भावूक आवाहन

रायगड लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल लक्षात घेतले तर मतदारसंघात शिवसेनेचे तीन, भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार आहे. त्यामुळे इतर दोन्ही मित्र पक्षांच्या तुलनेत शिवसेनेची मतदारसंघातील ताकद जास्त आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा शिवसेनेनी या मतदारसंघावर दावा सांगणे अधिक उचित असल्याची भुमिका युवासेनेनी घेतली आहे. आमदार भरत गोगावले यांचे सुपूत्र आणि युवासेनेचे नेते विकास गोगावले यांना रायगड लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी युवासैनिकांनी आता केली आहे. समाजमाध्यमांवर सध्या यांसदर्भात जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे. पक्षाकडेही यासंदर्भातील मागणी करण्यात आली आहे. रायगड हा शिवसेनेचा पारंपारीक मतदारसंघ राहीला आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपात तो शिवसेनेलाच मिळावा अशी भूमिका महाडच्या नितीन पावले यांनी केली आहे.

हेही वाचा : सुधा मूर्ती राज्यसभेत; राजकारणापल्याडच्या माणसांची राज्यसभेवर कशी होते निवड? काय असतात निकष?

आधी राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर भाजपा आणि आता शिवसेना शिंदे गट रायगड लोकसभेच्या जागेवरून आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे रायगड लोकसभेच्या जागेचा गुंता अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad bharat gogawale s son vikas gogawale claims on raigad lok sabha seat of ncp s sunil tatkare print politics news css
Show comments