अलिबाग: विधानसभा निवडणूक जाहीर होताच, रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसत आहेत. शिवसेनेच्या कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे. तर तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघ मिळावा अशी मागणी शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे दोन्ही सत्ताधारी पक्षात दबावाचे राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.

कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पारंपारीक विरोधी पक्ष आहेत. या मतदारसंघातून आलटून पालटून दोन्ही पक्षाचे आमदार निवडून येत राहीले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष या मतदारसंघासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र थोरवे निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड यांचा पाडाव केला होता. निवडणूकीनंतर हे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेसाठी एकत्र आले. पण कार्यकर्त्यमधील दरी काही मिटली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात कुरघोड्या चे राजकारण सुरूच राहीले.

हेही वाचा : “लॉरेन्स बिश्नोई व केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी शिजतंय”, पंजाब काँग्रेसचा गंभीर आरोप!

मध्यंतरीच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजप मध्ये केला. यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी मतदारसंघातून सुधाकर घारे यांना भावी उमेदवार म्हणून प्रोत्साहन देण्यास सुरवात केली. त्यामुळे घारे यांच्या महत्वाकांक्षा चांगल्याच वाढल्या. त्यांनी थोरवे यांची कोंडी करण्याचे धोरण स्विकारले. त्यामुळे मतदारसंघात दोन्ही पक्षात शाब्दीक वाद होत राहीले. त्यामुळे महायुतीतीत दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू राहीला. आता कर्जत विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करत महायुतीकडे या मतदारसंघाची मागणी केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : AIMIM चा महाविकास आघाडीत शिरण्याचा प्रयत्न; पण काँग्रेसकडून सावध भूमिका, कारण काय?

त्यामुळे शिवसेना शिंदे गटानेही आदिती तटकरे यांच्या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार चार वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे मतदारसंघात पक्ष संघटन चांगले आहे, असे सांगत जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पक्षाकडे या मतदारसंघाची मागणी केली आहे. कर्जत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा धर्म पाळणार नसेल तर श्रीवर्धन मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य करणार नाही असे घोसाळकर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीतील दोन घटक पक्षातील वाद उफाळून येण्याची चिन्ह दिसत आहेत.