अलिबाग – अजित पवार यांच्या बंडानंतर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्या पाठीशी राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता हा अदांज फोल ठरला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत, खालापूरमधील एक मोठा गट शरद पवार यांच्यासमवेत पुन्हा सक्रीय झाला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे तटकरे कुटुंबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुनील तटकरे यांचे कायमच एकहाती वर्चस्व राहिले आहे. संघटनात्मक पातळीवर आणि सत्ता पातळीवर तटकरे कुटुंब कायमच केंद्रस्थानी राहिले आहे. म्हणूनच जिल्ह्यातील पक्षसंघटनेत खासदार सुनील तटकरेंचा दबदबा कायम टिकून राहिला आहे. त्यामुळेच जेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट फुटला तेव्हा जिल्ह्यातील पक्षसंघटना ही सुनील तटकरे यांच्या पाठीशी कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण आता या अपेक्षेला सुरुंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हेही वाचा – पावसाची दडी आणि सांगलीत पाण्यावरून नेतेमंडळींची कुरघोडी
कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या एका मोठ्या गटाने शरद पवार यांच्या समवेत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी नव्याने संघटनात्मक बांधणीलाही सुरुवात केली आहे. लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर लगेचच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. हा तटकरे कुटुंबासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
सुरवातीला तटकरेंची नाराजी पत्करून कोणी शरद पवार गटात जाईल असे वाटत नव्हते. पण लाड यांच्या पाठोपाठ कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आता शरद पवार गटात सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना मात्र तटकरे यांच्या सोबत राहिली आहे. जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघापैकी कर्जत-खालापूर आणि श्रीवर्धन या दोनच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. यापैकी श्रीवर्धन हा एकमेव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. उर्वरित मतदारसंघात पक्षाची फारशी ताकद राहिली नाही. अशा परिस्थितीत पक्षात दोन गट पडल्याचा फटका पक्षाला पुढील काळात कर्जत खालापूर मतदारसंघात बसू शकतो.
हेही वाचा – भाजपाचे बळ वाढणार! चिराग पासवान यांचा NDA मध्ये सामील होण्याचा निर्णय
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमुळे रोवण्यात, संघटनात्मक बांधणी करताना तटकरे कुटुंबांनी कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण कायमच तटकरे कुटुंबाच्या भोवती फिरत आले आहे. तटकरेंचा शब्द हा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाठी प्रमाण राहिला आहे. त्यामुळे तटकरे कुटुंबातील पाचजणांची आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यातून आमदारपदावर वर्णी लागली आहे. सगळे काही सुरळीत सुरू असताना अजित पवार यांच्या पक्षांतर्गत बंडात तटकरे कुटुंबही सहभागी झाल्याने त्यांच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का बसला आहे.