हर्षद कशाळकर
अलिबाग : रायगड जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळ अलिबाग तालुक्यातील पक्षसंघटना कठीण परिस्थितीत टिकवून ठेवणारा आणखी एक शिलेदार पक्षाने गमावला आहे.
माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे अंत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अनंत गोंधळी यांची ओळख होती. यापुर्वी अलिबाग काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी अनेक वर्ष संभाळली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग तालुक्यात काँग्रेसचे संघटन टिकवून ठेवण्यात त्यांचे महत्वाचे योगदान होते. गेली काही वर्ष ते जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पण मधुकर ठाकूर यांच्या निधनानंतर पक्षाला एकसंघ ठेऊ शकेल असा एकही नेता पक्षात उरला नाही. ठाकूर कुटूंबाच गटतटाचे राजकारण सुरू झाले आणि पक्षाची वाताहत होण्यास सुरुवात झाली. मात्र तरिही गोंधळी खानाव, उसर परिसरात काँग्रेसचे अस्तित्व कायम राखले होते. मात्र मागील विधानसभा निवडणूकीपासून काँग्रेस पक्षाने शेकापशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले तेव्हा पासून मतदारसंघात काँग्रेसच्या अधःपतनाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली होती.
हेही वाचा… सांगली काँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण
अनेक नेत्यांनी काँग्रेसला पर्याय शोधण्यास सुरुवात केली. अमित नाईक, चारूहास मगर यांनी गेल्या वर्षी पक्षत्याग करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आता. गोंधळी यांच्या सारखा जनाधार असलेला नेताही काँग्रेसने गमावला. संघटनात्मक पातळीवर याची मोठी हानी होणार आहे. जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती फारशी चांगली राहीलेली माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काही महिन्यापुर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तर महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि प्रदेश सरचिटणीस असलेल्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे बुडत्याचा पाय आणखिन खोलात अशी गत काँग्रेसची झाली आहे.
हेही वाचा… नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विस्कळीत पक्ष संघटनेस एकसंघ करण्याचे आव्हान
जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष होते. पक्षाचे तीन तीन आमदार जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून येत असत. पण बॅरीस्टर ए आर अंतुले यांच्या पश्चात पक्षाची वाताहत सुरु झाली. देशपातळीवर आणि राज्यपातळीवर स्वताचे स्थान निर्माण करू शकेल असे नेतृत्व काँग्रेसला घडवता आले नाही. माणिक जगताप आणि मधुकर ठाकूर यांच्या पश्चात दुसरी फळी तयार होऊ शकली नाही. त्यामुळे वादळात भरकटलेल्या जहाजाप्रमाणे पक्षाच्या संघटनेची वाटचाल सुरु आहे. पक्षाचे कोकणातील संघटनेच्या बाबत असलेले उदासिन धोरण याला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाची आणखिन वाताहत झाली तर नवल वाटायला नको अशी कुजबूज पक्षाच्या वर्तुळात सुरु आहे.