अलिबाग- आधी माजी आमदार धैर्यशील पाटील, नंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर आणि आणि आता मुरूड तालुक्याचे चिटणीस मनोज भगत, रायगड जिल्ह्यात शेकापला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्ष संघटनेतील ही पडझड वेळीच रोखली नाही तर पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या जिल्ह्यातला शेतकरी कामगार आणि गरीब माणूस माझ्या सोबत आहे तोवर कोणी आले कोणी गेले तरी काही फरक पडत नाही. नेते सोडून गेले म्हणून पक्ष संपणार नाही. लालबावटा फडकवत ठेवण्याचे काम पक्षाचे कार्यकर्ते करत राहतील, असा विश्वास शेकाप सरचिटणीस शेकापच्या वर्धापन दिनी आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला होता. पण पक्षाला लागलेली ही गळती थांबवली नाही तर पक्ष संघटनेचे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

हेही वाचा – बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग

राज्यात २ ऑगस्ट १९४७ रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. या घटनेला ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यकाळात पक्षाने अनेक चढ उतार पाहिले. मात्र कठीण परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. त्यासाठी एन. डी. पाटील, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, गणपतराव देशमुख, विरेंद्र बाबू देशमुख, प्रभाकर पाटील यांनी अपार महेनत घेतली. आता आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सरू आहे. पण गेल्या दशकात राज्यात या पक्षाची मोठ्या प्रमाणात वाताहत झाल्याचे चित्र सार्वत्रिक दिसून येत आहे. याला शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्हा अपवाद राहिलेला नाही.

हेही वाचा – पंकजा मुंडेंच्या प्रचाराचे पालकत्व धनंजय मुंडे यांच्याकडे

रायगड जिल्ह्यातही पक्षाची परिस्थिती चिंताजनक आहे. पनवेल, उरण, पेणसारख्या शहरी भागात पक्षाची मोठी वाताहत सुरु झाली आहे. गेल्या काही निवडणुकांमधून याचीच प्रचिती येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकलेला नाही. शिवसेना आणि भाजप या पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. अशातच विवेक पाटील यांना कर्नाळा बँक घोटाळ्यात अटक झाली, त्यामुळे त्यांनी राजकीय सन्यास घेण्याची घोषणा केली, त्यामुळे पनवेल उरणमध्ये शेकापला मोठा धक्का बसला. पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पेण विधानसभा मतदारसंघात पक्षाची मोठी कोंडी झाली. प्रतिकूल परिस्थितीत अलिबागमध्ये पक्षाचे संघटन टीकून होते. पण आता अलिबाग विधानसभा मतदारसंघातही पक्षाला गळती लागली आहे.

हेही वाचा – अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

आधी शेकापचे दांडगा लोकसंपर्क असलेले लोकाभिमुख कामांसाठी ओळख असलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर पक्षाला सोडून गेले. त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे अलिबाग तालुक्यात पक्षाला धक्का बसला. आता मुरूड तालुक्याची गेली २१ वर्षे तालुका चिटणीस असलेले मनोज भगत यांनीही पक्षाला अखेरचा लाल सलाम केला आहे. आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे मुरूड तालुक्यातील पक्ष संघटन अडचणीत आले आहे. पक्षात शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या सून चित्रलेखा पाटील यांच्याकडून जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची कोंडी केली जात असल्याचा थेट आरोप केला. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे भगत यांनी सांगितले. त्यामुळे पक्ष संघटनेसाठी ही धोक्याची घंटा आहे.

हेही वाचा – वर्ध्यात महाविकास आघाडीत त्रांगडे

एकेकाळी राज्याचे विरोधीपक्षनेतेपद भुषवणारा हा पक्ष अलीकडच्या काळात रसातळाला गेला आहे. जुने जाणते नेते पक्षाला सोडून चालले आहेत. विधानसभेत पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. आता जिल्ह्यातील पक्षसंघटन अडचणीत येऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला व्यापक प्रयत्न करावे लागणार आहे. जुन्या जाणत्या नेत्यांना विश्वासात घेऊन संघटनात्मक बांधणी करावी लागेल. माजी आमदार पंडीत पाटील आणि आस्वाद पाटील यांना संघटनेत पुन्हा सक्रीय करावे लागणार आहे.