अलिबाग : रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सुनील तटकरे विरुध्द अनंत गिते अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. असे झाले तर सलग तिसऱ्यांना दोघे एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. २०१४ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे अनंत गिते विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्या थेट लढत झाली होती. ज्यात अनंत गिते अवघ्या २ हजार मतांनी निवडून आले होते. २०१९ मध्ये पुन्हा दोघे एकमेकांविरोधात लढले होते. या लढतीत तटकरे यांनी अनंत गितेंचा तीस हजाराच्या मताधिक्याने पराभव केला होता. आता २०२४ मध्ये पुन्हा याच दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडून अनंत गीते याची उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या निवडणूकीत तटकरेंसोबत असलेल्या शेकपनेही यंदा गिते यांना पाठींबा जाहीर केला आहे. काँग्रेसकडून गितेंच्या उमेदवारीला फारसा अडसर होणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे अनंत गितेंनी निवडणूक प्रचाराला सुरवातही केली आहे.
हेही वाचा : पालघरमध्ये राजकीय संभ्रम कायम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उमेदवार भाजप पळविणार का?
दुसरीकडे महायुतीत रायगडच्या जागेवरून खल सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह, शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या जागेसाठी आग्रही आहेत. भाजपकडून माजी आमदार धैर्यशील पाटील, शिवसेना शिंदे गटातून आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले. आणि तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची नावे चर्चेत आहेत.
महायुतीकडून रायगडचा लोकसभा मतदारसंघ यंदा भाजपला मिळावा यासाठी स्थानिक कार्यकर्ते आग्रही होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणीही केली होती. ही मागणी करतांना कुठल्याही परिस्थितीत सुनील तटकरे उमेदवार नकोच असा सुचक इशाराही दिला होता. त्यामुळे रायगडच्या जागेवरून महायुतीत जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत मतदारसंघावरील दावा सोडणार नसल्याचे पक्षाचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते.
हेही वाचा :राज्यात कोण किती पाण्यात याचा येणार अंदाज, जनतेच्या न्यायालयातील लढाईचा कौल निर्णायक
पण ज्या पक्षाचा विद्यमान खासदार त्याच पक्षाचा उमेदवार असे सुत्र जागा वाटपाच्या वेळी लावले जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे रायगड मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे यांचीच वर्णी लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तटकरेंनी त्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. पाच वर्षात जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहेत. त्यामुळे युत्या आघाड्यांची समीकरणे बदलली आहे. या बदललेल्या परिस्थितीचा फायदा गितेंना होणार की तटकरेंना हे पाहणे आता औत्सुक्याचे असणार आहे. गीते विरूध्द तटकरे लढतीचा तिसरा अंकही लक्षवेधी असेल यात मात्र शंका नाही.