अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यांची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडीने बारामती पॅटर्न राबविण्याचे धोरण स्विकारले आहे. सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचारासाठी महाविकास आघाडीने त्यांचे जेष्ठ बंधू अनिल तटकरे यांना प्रचारात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ते तटकरेंविरोधात प्रचाराची धुरा संभाळतांना दिसत आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा दोन तुल्यबळ उमेदवारांमधील लढत पहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे तटकरे विरुध्द गिते लढतीचा तिसरा सामना सुरू झाला आहे.
हेही वाचा : शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने लातूरमधील राजकीय गणिते बदलली
सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणाची सुत्र हलविणाऱ्या महत्वाच्या पुढाऱ्यांमध्ये सुनील तटकरे यांचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दुसऱ्या क्रमांकाचे वजनदार नेते म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. रायगडच्या राजकारणावर त्यांची घट्ट पकड आहे. सर्वपक्षीय नेत्यांची नाराजी घेऊनही त्यांनी जिल्ह्यातील राजकारणावरची आपली पकड आणि महत्व सैल होऊ दिलेले नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा रायगडकरांना पहायला मिळत आहे. महायुतीतून तटकरे उमेदवार नको यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून टोकाचे प्रयत्न झाले.पण तरीही उमेदवारीची माळ तटकरेंच्या गळ्यात पडली.
त्यामुळे विरोधकांनी सुनील तटकरे यांची कोंडी करण्यासाठी बारामती पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती मध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची कोंडी करण्यासाठी पवार कुटूंबातील सदस्यांचा वापर करण्याचे धोरण शरद पवार गटाने स्विकारले आहे. सुप्रिया सुळे, रोहीत पवार, श्रीनिवास पवार यांच्याकडून अजित पवारांना लक्ष्य केले जात आहे. कुटूंबातून होणाऱ्या या विरोधाचा अजित पवारांसाठी सर्वाधिक अडचणीचा ठरतो आहे.
हेही वाचा : नगरमध्ये सुजय विखे यांना निलेश लंके यांचे आव्हान
याच धर्तीवर आता रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांच्या विरोधात तटकरे कुटूंबाचा वापर करण्याचे धोरण महाविकास आघाडीने स्विकारले आहे. सुनील तटकरे यांचे जेष्ठ बंधू आणि माजी आमदार अनिल तटकरे हे सध्या महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी होतांना दिसत आहेत. शरद पवार गटातून ते महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारात उतरले आहेत.
सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्या कुटूंबातील वाद सर्वश्रूत आहेत. दोन्ही कुटूंबातील वाद विकोपाला आधी गेले आहेत. याच वादाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करण्याचे धोरण सध्या महाविकास आघाडीने स्वीकारले आहे. तटकरे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी तटकरे यांचाच वापर करण्यास महाविकास आघाडीने सुरूवात केली आहे. अलिबाग मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात तसेच मुरूड येथे झालेल्या शेकापच्या निर्धार मेळाव्यात याचीच प्रचिती आली आहे. दोन्ही ठिकाणी अनिल तटकरे हे सुनील तटकरे यांच्या विरोधात प्रचार करतांना दिसले.
हेही वाचा : सांगलीतील वादात जयंत पाटील यांचे मौन संशयास्पद
पक्षांतर्गत बंडखोरीनंतर शरद पवार यांनी अनिल तटकरे यांना सोबत घेऊन त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले अनिल तटकरे पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात आले आहेत. आता त्यांचा वापर करून सुनील तटकरे यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या निवडणूकीच्या निमित्ताने सुरू झाला आहे. सध्या सुनील तटकरे यांच्यावर थेट शाब्दीक हल्ले चढविणे अनिल तटकरे यांनी टाळले असले तरी प्रचाराच्या उत्तरार्धात तसे हल्ले चढवले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तटकरेन विरोधातील तटकरेंची तटबंदी निवडणुकीत कितपत प्रभाव पाडू शकेल हे सुद्धा पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.