अलिबाग – रायगड जिल्ह्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेकापने आपले वर्चस्व राखले. पेणची कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपने शेतकरी कामगार पक्षाकडून ताब्यात घेतली. कर्जत, खालापूर, माणगाव, महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचा चंचू प्रवेश झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यापैकी पनवेल, महाड, माणगाव, खालापूर आणि रोहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तर अलिबाग, पेण, मुरुड, कर्जत येथे प्रत्यक्ष मतदान झाले. बाजार समित्यांवर आजवर शेतकरी कामगार पक्षाचा एकहाती अमंल राहिला आहे. याला शिवसेना शिंदे गट आणि भाजपने पंहिल्यांदाच आव्हान दिले होते. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरली.

हेही वाचा – विदर्भात फडणवीस समर्थकांना झुकते माप, वादग्रस्त मुन्ना यादवांची नियुक्ती

सर्वाधिक जागा जिंकत शेकापने आपली बाजार समित्यांवरील पकड कायम राखली. नऊ पैकी सात बाजार समित्या शेकापने राखल्या आहेत. तर महाड येथे काँग्रेसच्या मदतीने शेकापला सत्तेत सहभागी होता येणार आहे. ही एक दिलासादायक बाब असली तरी पेण येथील पराभाव शेकापच्या जिव्हारी लागला आहे. माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षाला बसलेला हा मोठा धक्का आहे.

जिल्ह्यातील कृषी बाजार समित्यांमधे आजवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला फारसे स्थान नव्हते. यंदा पहिल्यांदाच दोन्ही पक्ष या निवडणुकीत उतरले होते. पूर्ण ताकदीने त्यांनी ही निवडणूक लढवली. यात भाजपला पेणची कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकण्यात पहिल्यांदाच यश आले आहे. १८ पैकी १७ जागा जिंकत भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

हेही वाचा – मणिपूरमध्ये हिंसाचार; आदिवासी-बिगर आदिवासींमध्ये संघर्षाचे कारण काय?

शिवसेनेच्या शिंदे गटाला जिल्ह्यातील एकही कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकता आली नसली तरी महाड, माणगाव, खालापूर, कर्जत, खालापूर येथे त्यांचे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पक्षाचा चंचू प्रवेश झाला आहे. तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे अलिबाग, पनवेल महाड येथे सदस्य निवडून आले आहेत.

शेकापचे सर्वाधिक ९६, राष्ट्रवादी काँग्रेस २०, भाजप १७, काँग्रेस १३, शिवसेना शिंदे गट १० तर शिवसेना ठाकरे गट ३ सदस्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर निवडून आले आहेत. त्यामुळे बाजार समित्यांवर शेकापची पकड अजूनही मजबूत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.