अलिबाग: रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नुकतेच प्रचारासाठी गुहागर दौऱ्यावर असताना जाहीर सभेतच ठाकरे गटात नाराजी नाट्य रंगल्याचे पहायला मिळाले. आमदार भास्कर जाधवांनी अनंत गीते यांना भाषण करतांना मध्येच रोखले, आपली जाहीर नाराजी व्यक्त केली.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार टीपेला पोहोचला आहे रायगड लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. अशातच गुहागर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटातील आंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.
हेही वाचा : काँग्रेसविरोधात भाजपाचा खोटा प्रचार केवळ भीतीपोटी; सचिन पायलट यांचा हल्लाबोल
अनंत गीते याचंया प्रचारासाठी गुहागर येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते. सभेला गीते संबोधित करत असतांना भास्कर जाधव यांनी मध्येच माईक हातात घेतला आणि गिते यांना आपले वक्तव्य मागे घेण्याची विनंती केली. त्याच वेळी पुन्हा असा उल्लेख करू नका असे कठोर शब्दात सुनावले. गीतेंनी सभेला संबोधित करत असतांना, गेल्या निवडणूकीत गुहागर मतदारसंघात मी सुनील तटकरे यांच्या विरोधात नाही लढलो. तर भास्कार जाधव यांच्या विरोधात लढलो असा उल्लेख केला. हे वाक्य ऐकून भास्कर जाधवांनी माईक हातात घेतला. गीते साहेब माफ करा तुम्ही असे विधान करणे टाळले पाहीजे, कारण तुमचे खाली बसलेले चेलेचपाटे त्याचा वेगळ्या अर्थाने प्रचार करतात. मी ज्या पक्षात होतो. त्या पक्षाचे काम करत होतो. मी गद्दारी केली नाही. मी गेल्या निवडणूकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होतो म्हणून तटकरेंचा प्रचार केला. त्यामुळे अशी विधाने टाळा असे जाधवांनी सुनावले.
हेही वाचा : उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि योगींच्याच विरोधकांपेक्षा अधिक सभा!
यानंतर गीतेंनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरवात केली. जाधवांनी माझे पूर्ण वाक्य ऐकलेच नाही, तटकरेंचे या मतदारसंघात कालही काहीच नव्हते आणि आजही नाही. जे काही होते ते भास्कर जाधवांचेच होते. ते आता आपल्या सोबत आहेत. ही जमेची बाजू आहे. मतदारसंघात आता आपल्याला प्रतिस्पर्धीच उरला नसल्याचे स्पष्टीकरण यानंतर गीते यांनी दिले. मात्र प्रचार सभेतील या घटनेनंतर दोन्ही नेत्यांमधील नाराजीची चर्चा मात्र सुरू झाली.