अलिबाग – सत्तासंघर्षानंतरही रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही. शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथील जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांच्या विरोधात अपशब्द काढले. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गटातील) वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार थोरवे विरोधात आक्रमक झाली आहे.
आमदार थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलतांना थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना लक्ष्य केले. महाविकास आघाडीत शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले असूनही राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिले गेले. पालकमंत्री झाल्यावर त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना सापत्न वागणूक देण्यास सुरवात केली. याची तक्रार करूनही आदित्य ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे आदिती यांच्या विरोधात पालकमंत्री हटावचा नारा द्यावा लागला. ही टिकाटिप्पणी करतांना थोरवे यांनी आदिती तटकरे यांच्याबद्दल एक अपशब्द वापरला. ही वक्तव्य समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने थोरवे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. थोरवे यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा वक्तव्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटतील, असा इशारा जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी दिला. राजकारणात मतभेद असू शकतात, पण महिलांवर पातळी सोडून टीका करणे योग्य नाही. सध्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून महिला आमदार आणि खासदारांबद्दल वारंवार अपशब्द काढण्याच्या घटना घडत आहेत. सुसंकृत आणि पुरोगामी महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींबद्दल अनुद्गार काढणे योग्य नाही. आदिती तटकरे यांनी पालकमंत्री पदाच्या काळात अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प जिल्ह्यात आणले. रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली. त्यामुळे त्यांनी आपले कर्तृत्व कामातून सिद्ध केले आहे. तटकरे कुटुंबाला बाजूला ठेऊन जिल्ह्यावर वर्चस्व मिळविण्याचे पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्यात सत्तासंघर्षाची बीजं रायगड शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षातून रोवलं गेलं होतं. त्यामुळे आता याच वादाचा दूसरा अंक जिल्ह्यात पून्हा सुरू झाला की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.