अलिबाग- ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या खासदार सुनील तटकरे यांच्यावरील टीकेनंतर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. थोरवे यांच्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे. त्यामुळे घटक पक्षातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद काही नवे नाहीत. महाविकास आघाडी सरकार असो अथवा महायुतीचे सरकार असो दोन्ही पक्षांतील वाद, धुसफूस सातत्याने समोर येत राहिली आहेत. किंबहूना शिवसेनेमधील पक्षांतर्गत बंडखोरीला याच वादाची किनार राहिली आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षांतील वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हेही वाचा – शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक, नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद नसल्याचा दावा
शिवसेनेची जिल्हा कार्यकारीणीची एक बैठक नुकतीच पेण येथे पार पडली. या बैठकीत शिवसेने कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनी महायुतीचा धर्म पाळला नाही तर तटकरे यांचा कडेलोट करावा लागेल असे धक्कादायक विधान केले होते. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुधाकर घारे यांनी आमदार थोरवे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तुम्ही कडेलोट करता की आम्ही तुम्हाला हत्तीच्या पायाखाली तुडवू हे वेळ येईल तेव्हा आम्ही दाखवून देऊ, असा थेट इशारा घारे यांनी दिला. जी व्यक्ती स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांवर धाऊन जाते, त्यांच्याकडून संयमाची अपेक्षा कशी बाळगायची, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. थोरवेंच्या वक्तव्यांना वेळीच आवर घाला, नाहीतर त्याचे विपरीत परिणाम आगामी काळात पहायला मिळतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. त्यांमुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाकयुद्धाला तोंड फुटले आहे.
हा वाद शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपुरता मर्यादित नाही. या वादाला तिसरा कोनही आहे. रायगड जिल्ह्यातील भाजपदेखील महायुतीबाबत फारशी समाधानी नाही. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास भाजपचा विरोध आहे. कुठल्याही परिस्थितीत सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार नकोच, अशी आग्रही मागणी रायगडच्या भाजपने पक्षश्रेष्ठींकडे जाहीरपणे केली आहे. तटकरेंबाबत भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आधीच अडचण झाली आहे. अशातच आता शिवसेना शिंदेगटही तटकरेंविरोधात आक्रमक झाल्याने निवडणुकीच्या आधी आगीत तेल पडले आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षात निवडणुकीच्या तोंडावर भडका उडण्याची शक्यता आहे.
अलिबाग आणि पेण मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदेगटात अंतर्गत धुसफूस पहायला मिळत आहे. वेळोवेळी दोन्ही पक्षांतील सुप्त संघर्ष समोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीत सगळं काही ठिक नसल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील घटक पक्षातील हा विसंवाद, नाराजी, बेबनाव आणि संघर्ष हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे.