हर्षद कशाळकर
अलिबाग : शिंदे गटाला सोबत घेऊन राज्यात सत्तेत आल्यानंतर रायगड जिल्ह्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि शेकापचे दिलीप भोईर भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर पेण मधील शेकापचा बडा नेताही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
सत्तासंघर्षानंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाला. शिवसेनेनेचे तीनही आमदार शिंदे गटात गेले. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दुभंगली गेली. सेनेतील फुटीचे प्रकरण न्यायालयात गेल्याने पक्षांतर्गत अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले. त्यामुळे सत्तेत असूनही शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ आटला आहे. मात्र त्याच वेळी जिल्ह्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
हेही वाचा… एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात राजकीय पाठबळ; ठाकरे गट, राष्ट्रवादीला धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधागड पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नगराध्यक्षपदाचा आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन द्या भाजपमध्ये सहभागी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या गीता पालरेचा या कन्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहीले आहे. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पदाची धुराही त्यांनी यापुर्वी संभाळली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा… मंत्र्यांच्या वाढदिवसाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
अलिबाग तालुक्यातील शेकापचे चर्चेतील नेते दिलीप भोईर हे देखील भाजपमध्ये दाखल झालेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा सभापती पदाचा कार्यभार दोन वेळा त्यांनी संभाळला आहे. मतदारसंघात नाविन्यपुर्ण उपक्रम राबिवण्यासाठी ते ओळखले जातात. गेली दोन वर्ष ते पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र शिवसेनेतील गटातटांची एकुण परिस्थिती पाहता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने अलिबाग विधानसभा मतदारसंघात प्रस्तापित चेहरा भाजपला मिळाला.
हेही वाचा… बच्चू कडू यांचे पुढील लक्ष्य नागपूर
पेण विधानसभा मतदारसंघातील शेकापचा एक बडानेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. तसे झाल्यास शेकापचे पेण विधानसभा मतदारसंघातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. शेकापची मुलूखमैदान तोफ म्हणून या नेत्याची ओळख आहे. त्यामुळे भाजपचा रायगडमधील लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून या नेत्याकडे बघीतले जात आहे.
हेही वाचा… भाजपशी मैत्री केलेल्या अन्य प्रादेशिक पक्षांसारखीच शिवसेनेची अवस्था होणार का ?
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि पेण विधानसभा मतदारसंघात भाजपने गेल्या काही वर्षात संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. विविध पक्षातील प्रस्तापित नेते पक्षात घेऊन स्वताची ताकद वाढवण्याचे धोरण भाजपने स्विकारले आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने अनेक ठिकाणी पक्षाला वाढण्याची संधी मिळत नव्हती. शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपकडे ही संधी आपोआप चालून आली आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही पक्षाने सुरु केले आहेत.
एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटात जाण्यापेक्षा भाजप मध्ये सहभागी होण्याकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाची न्यायालयीन लढाई सध्या भाजपच्या मात्र पथ्यावर पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.