उद्धव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी ?

विधानपरिषद निवडणूकीपाठोपाठ विधानसभा निवडणूकीतही शेकापची कोंडी करण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतल्याचे समोर येत आहे .

uddhav Thackeray
उध्दव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी ? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अलिबाग- विधानपरिषद निवडणूकीपाठोपाठ विधानसभा निवडणूकीतही शेकापची कोंडी करण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतल्याचे समोर येत आहे . रायगड पाठपोठोपाठ आता सांगोल्यातही शेकापच्या जांगांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला आंहे.

लोकसभा निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीची साथ दिली होती. रायगड आणि मावळ मतदारसंघात उमेदवार न देता शेकापने शिवसेोच्या (ठाकरे) उमेदवारांना पाठींबा दिला होता. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणू अशी हमी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी यावेळी दिली होती. मात्र दोन्ही मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. विशेषतः रायगडमधून अनंत गीते यांचा झालेला पराभव उध्दव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला. निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात शेकापची अपेक्षित मदत झाली नसल्याने स्पष्ट झाले. अलिबाग आणि पेण सारख्या शेकापची ताकद असलेल्या मतदारसंघात अनंत गीते यांची मोठी पिछेहाट झाल्याचे दिसून आले. या पराभवानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे संबध ताणले गेले आहेत.

हेही वाचा : जागावाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत वाद; तुटेल इतके ताणू नये; उद्धव ठाकरे यांची अपेक्षा

दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत याचीच प्रचिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांना विधान परिषदेसाठी पाठींबा जाहीर केला होता. उध्दव ठाकरे यांची साथ मिळाली असती तर जयतं पाटील पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडून गेले असते. मात्र शेवटच्या क्षणी ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडूनही आणले. नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला.

विधान परिषदेपाठोपाठ विधानसभा निवडणूकीत शेकापची कोंडी करण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारल्याचे दिसून येत आहे. शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीकडून अलिबाग, पेण, उरण आणि पनवेल या चार जागांसह सांगोला, नांदेड मधील लोहा या जागांची मागणी केली आहे. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी या जागा महाविकास आघाडीकडून शेकापला मिळाव्यात अशी मागणी केली आहे. पण शिवसेनेने या चारही मतदारसंघांत आपले उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. अलिबाग मधून जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तर पेण मधून किशोर जैन यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. दोन्ही जागा किंवा किमान एक जागा मिळावी अशी इच्छा जिल्हाप्रमुख यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. उरण मधून माजी आमदार मनोहर भोईर निवडणूकीची तयारी करत आहेत. तर पनवेल मधून बबन पाटील यांची मोर्चेबांधणी सुरु आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात ३१ जागांवर ‘खेला’ होणार? मतविभागणी जवळपास समसमान, ‘काठावरच्या’ मतदारसंघांत कुणाची होणार सरशी?

रायगड पाठोपाठ सांगोला या शेकापच्या पारंपारीक मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावेदारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे गणपतराव देशमुख यांच्या बालेकिल्ल्यातही शेकापची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In raigad uddhav thackeray dont need support of shetkari kamgar paksh print politics news css

First published on: 19-10-2024 at 11:02 IST
Show comments