अलिबाग : रायगड जिल्ह्यात पक्षांतर्गत बंडामुळे कमकूवत झालेल्या शिवसेना ठाकरे गटाची भिस्त आता इंडीया आघाडीवर अवलंबून असणार आहे. याचीच प्रचिती अलिबाग येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आली. अहंकार मानपान बाजूला ठेऊन शेकाप आणि मित्र पक्षांशी जुळवून घ्या असे स्पष्ट निर्देश शिवसेना नेते अनंत गीते यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
भरत गोगावले, महेंद्र दळवी, आणि महेंद्र थोरवे या तिन्ही आमदारांच्या बंडामुळे रायगडात शिवसेना ठाकरे गट कमकूवत झाला आहे. आमदारांच्या बंडामुळे पक्षात निर्माण झालेली पोकळी सहजासहजी भरून निघणारी नाही. जुने जाणते कार्यकर्ते पक्षात कायम असलेले तरी, जनाधार असलेले नेतृत्व पक्षाकडे राहीलेले नाही. त्यामुळे आगामी काळात पक्षाची भिस्त सहयोगी पक्षांच्या मदतीवर अवलंबून राहणार आहे. त्यादृष्टीने पक्षाने पाऊले टाकायला सुरूवात केली आहे. अलिबाग आणि मरूड येथे झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीच्या निमित्ताने याची प्रचिती आहे.
हेही वाचा : अक्कलकोटमध्ये पाण्याच्या श्रेयावरून राजकारण तापले
जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत जागा वाटपावरून शेकाप आणि शिवसेना ठाकरे गटात कुरबूरी झाल्याचे पहायला मिळाले होते. आघाडीत सन्मानजनक वाटा मिळाला पाहीजे, बॅनरवर पक्षाच्या नेत्यांना स्थान मिळाले पाहीजे अशी अपेक्षा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. या तक्रारींनंतर अनंत गीते यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षादेश पाळावाच लागतील. तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि शेकापशी जुळवून घ्या असा थेट आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
हेही वाचा : मोदींच्या मतदारसंघात नितीश कुमारांची सभा; पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न!
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या इंडीया आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या आहेत. दोन्ही लोकसभा मतदारसंघ आणि ११ विधानसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे ज्या पक्षाचा जो उमेदवार दिला जाईल त्याचा पाठीशी ठामपणे उभे रहा असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. लोकसभेच्या रायगड आणि मावळ दोन्ही जागा लढवायच्या आणि त्या मोबदल्यात काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेंस शरद पवार गटाला विधानसभेच्या जागा लढवू द्यायच्या असे धोरण ठाकरे गटाने अवलंबिल्याचे सध्या दिसून येत आहे.