अलिबाग : नावात काय आहे, असे म्हणतात. पण रायगडचे संपूर्ण राजकारण या नावांभोवती फिरत असते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही याचाच प्रत्यय रायगडकरांना अनुभवायला मिळणार आहे. एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे करून विरोधकांची कोंडी करण्याची परंपरा रायगडकरांनी यावेळीही कायम राखली आहे. त्यामुळे नामसाधर्म्याचा फायदा घेऊन मतदारांच्या मनात गोंधळ उडवण्यासाठी प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जाणार आहे.

विरोधकांच्या मतांचे विभाजनकरून स्वत:चा विजय सोपा करण्याचा हा फंडा रायगडच्या राजकारणाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. सर्वच राजकीय पक्षांचा यात मोठा वाटा आहे.

हेही वाचा : परभणीत ‘वंचित’च्या उमेदवाराचा अर्ज छाननीत अवैध, जिल्ह्यातल्या चार मतदारसंघात १९२ अर्ज पात्र

परंपरा कायम

एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची परंपरा रायगडकरांनी कायम राखली आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात तीन बाळराम पाटील, तीन प्रशांत ठाकूर नावाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपचे तर मुळचे शेकापचे असलेले बाळाराम पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघातून आमदार महेंद्र थोरवे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला आणखी एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे. उरण मतदारसंघातून शेकापचे प्रीतम म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले दोन अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मनोहर भोईर हे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्याशिवाय आणखी एक मनोहर भोईर नावाचा उमेदवार निवडणूक लढवत आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र दळवी नावाचे चार, तर दिलीप भोईर नावाचे दोन उमेदवार निवडणुक लढवत आहेत. आमदार महेंद्र दळवी हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत.

हेही वाचा :बंडखोरीमुळे गडचिरोलीत महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ, गडचिरोलीतील तीन विधानसभेत काँग्रेसकडून ७ तर भाजपचे दोघे अपक्ष लढण्यावर ठाम

विरोधकांची मते कमी करण्याचा फंडा

● २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सनील तटकरे यांच्या नावाचा उमेदवार निवडणुक रिंगणात होता. त्याला ९ हजारहून अधिक मते मिळाली होती. या निवडणुकीत तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना २ हजार १०० मतांनी पराभूत व्हावे लागले होते.

● शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वर्गीय अॅड. दत्ता पाटील यांच्या विरोधात त्याच नावाचे तीन उमेदवार १९९६ च्या लोकसभा निवडणूकीत उभे करण्यात आले होते.

● २००४ च्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे ए. आर. अंतुले यांच्या नावाशी साधर्म्य असलेला ए. आर. अंतुले नामक उमेदवार उभा होता. तत्याला तब्बल २३ हजार ७७१ मते मिळाली होती.

● २००४ मध्ये झालेल्या निवडणूकीत अलिबागमधून शेकापच्या मिनाक्षी पाटील यांच्या विरोधात तब्बल सात मिनाक्षी पाटील उभ्या होत्या.