चुरू (राजस्थान) : राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची संधी न मिळाल्यामुळे जाट समाज नाराज असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाटांचे हितसंबध जपले नसल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असून भाजपच्या जाट उमेदवारांमुळे शेखावटी प्रदेशातील लढाई अधिक चुरशीची झाली आहे.
राजस्थानमधील १० जिल्ह्यांतील ५० हून अधिक मतदारसंघांमध्ये जाट समूहाचे प्रभुत्व आहे. शेखावटी प्रदेशातील अजमेर, अलवर, चुरू, जयपूर, झुंझुनू, नागौर आणि सिकर या जिल्ह्यांमध्येही जाट निर्णायक असून अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात जाट उमेदवार दिले आहेत. त्यामुळे यावेळी जाट कोणाला पाठिंबा देतील यावर भाजपचा सत्ता मिळण्याचा मार्ग सुकर होईल असे मानले जाते.
राजस्थानमध्ये दोन प्रकारचे ओबीसी आहेत. माळी वगैरे मूळ ओबीसी. जाट नवे ओबीसी. ओबीसींमध्ये जाटांना वाटा मिळाल्याने मूळ ओबीसींचा त्यांच्यावर राग. मुख्यमंत्री अशोक गेहलोत माळी समाजाचे असून ते मूळ ओबीसी आहेत. गेहलोतांनी जाट समूहासाठी काहीही केले नसल्याचा आरोप जाट नेते करत आहेत. गेहलोत यांनी केसरीसिंह राठोड या राजपूत नेत्याची राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली होती. राठोड यांनी जाटांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळेही जाट गेहलोतांवर नाराज झाल्याचे सांगितले जाते. शिवाय, नागौर जिल्ह्यातील प्रभावी जाट नेते व खासदार हनुमान बेनिवाल तसेच, जाट महासभेचे अध्यक्ष राजाराम मील यांनी जाटांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. भाजपने जाट नेते जगदीश धनखड यांना उपराष्ट्रपती करून जाट समूहाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसने सचिन पायलट यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्यानंतर जाट नेते गोविंदसिंह डोटासरा यांना प्रदेशाध्यक्ष केले. डोटासरा हे शेखावटी प्रदेशातील प्रभावी नेते असून लक्ष्मणगढ मतदारसंघामध्ये त्यांचे प्राबल्य आहे. पण, यावेळी भाजपने त्यांच्याविरोधात जाट उमेदवार उभा केल्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पेपरलिक प्रकरणात त्यांच्याविरोधात ‘ईडी’ची चौकशी सुरू आहे. इथे सुमारे ६० हजार जाट मतदार असून दोन्ही जाट उमेदवारांमुळे मतविभागणीचा लाभ मिळण्याची भाजपला आशा आहे. पण, ‘अगदी कमी मताधिक्याने जिंकतील’, असे डोटासरांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : ‘कॅश फॉर ट्रान्सफर’च्या आरोपावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मोठे विधान; म्हणाले “तर मी…”
चुरूमध्ये विरोधीपक्षनेते व भाजपमधील प्रभावी राजपूतनेते राजेंद्र राठोड यांच्या जागी भाजपने जाट उमेदवार दिला आहे. राठोड यांना शेजारील तारानगर मतदारसंघात काँग्रेसच्या तुल्यबळ जाट नेत्याविरोधात उभे केले आहे. चुरूमध्ये ६०-६५ हजार जाट मतदार आहेत. राठोड यांचे विश्वासू जाट नेते हरीलाल सहारण हे काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवाराविरोधात उभे राहिले आहेत. इथे जाट मतदारांच्या पाठिंब्यावर भाजपने विजयी होण्याचा दावा केला आहे. तारानगरमध्ये ७५ हजार जाट मतदार असून काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. राजेंद्र राठोड यांना जिंकण्यासाठी जाट मते खेचून आणावी लागतील. तारानगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीरसभा घेतल्यामुळे इथली जाट लढाई आणखी तीव्र झाली आहे.
जाट समूहाच्या अधिवेशनांमध्ये जाट उमेदवारांना मते देण्याचे आवाहन केले गेले. जिथे जाट विरुद्ध जाटेतर अशी लढाई असेल तिथे उमेदवार बघून मते दिली जातील. चौंमू मतदारसंघात पहिल्यांदाच जाट उमेदवार रिंगणात असल्याने तिथे काँग्रेसला विजयाची संधी असेल. काँग्रेसने सर्वाधिक ३६ तर, भाजपने ३३ जाट उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शेखावटी प्रदेशात २१ मतदारसंघांमध्ये जाट निर्णयक आहेत.
हेही वाचा : अकोल्यात भाजप व ‘वंचित’मध्ये कलगीतुरा
नागौर जिल्ह्यामध्ये जाट नेते व खासदार हनुमान बेनिवाल प्रभावशाली आहेत. बेनिवालांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने (आरएलपी) २०१९ मध्ये ‘एनडीए’मध्ये सामील होऊन मोदी सरकारला पाठिंबा दिला होता. यावेळी विधानसभा निवडणुकीत बेनिवालांनी दलित नेते चंद्रशेखर आझाद यांच्याशी युती केली आहे. विद्यमान खासदार हनुमान बेनिवाल आता नागौरमधील खींवसर मतदारसंघातून निवडणूक लढवत असून भाजप-काँग्रेस दोन्हींवर टीका करत आहेत. आत्ता दोन्ही पक्षांशी समान अंतर राखून असले तरी बेनिवाल अखेर भाजपला पाठिंबा देतील, अस कयास व्यक्त केला जातो. गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत बेनिवाल यांच्या ‘आरएलीपी’च्या जाट उमेदवारांचा सर्वाधिक लाभ काँग्रेसला झाला होता. पण, जाट मते एकत्रित झाल्याने ‘आरएलपी’चे प्राबल्यही वाढल्याचे स्पष्ट झाले. यावेळी बेनिवाल यांच्या पक्षाकडे अधिकाधिक जाट मतदार वळाले तर त्याचा फायदा काँग्रेसला की भाजपला होणार यावरही शेखावटी प्रदेशात कोणाचे वर्चस्व हे ठरेल.