तिजारा (राजस्थान) : ‘विकास हेच माझे लक्ष्य असेल, मला निवडून दिले तर तिजाराचा विकास होईल’, असे आवाहन भाजपचे तिजारा मतदारसंघातील उमेदवार बाबा बालकनाथ यांनी मुस्लिमबहुल गावात केले. मुस्लिमबहुसंख्य गावांमध्ये ते विकासाचा तर, हिंदुबहुल भागांमध्ये मुस्लिमविरोधाचा प्रचार करत आहेत. तिजारामध्ये तब्बल ७५ हजार मुस्लिम मतदार असून बाबांसमोर काँग्रेसचे मुस्लिम उमेदवार इम्रान खान यांना पराभूत करण्याचे आव्हान आहे.
अलवर-दिल्ली महामार्गाच्या एका बाजूला अहिरवाल (यादव) व मेघवाल वगैरे दलित जाती तर, दुसऱ्या बाजूला प्रामुख्याने मुस्लिम आणि दलितांमधील इतर काही जातींचे प्राबल्य आहे. तिजारा हा मतदारसंघ हरियाणा-उत्तरप्रदेशच्या सीमेवरील मेवात प्रदेशात आहे. हरियाणातील नूह, दिल्ली राजधानी क्षेत्रातील अलवर जिल्ह्याचा पूर्व भाग व त्याला लागून असलेल्या भरतपूर जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे मेवात. या भागाला हिंदू-मुस्लिम संघर्षाची पार्श्वभूमी असून नूहमध्ये काही महिन्यांपूर्वी दंगलही झाली होती. गौ-तस्करी हा संवेदनशील विषय बनलेला आहे.
हेही वाचा : मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर भाजप एकाकी
‘तिजारामध्ये ‘ते विरुध आम्ही’ अशी लढाई असून आम्ही त्यांना पराभूत करू आणि बाबांना राजस्थानचे मुख्यमंत्री बनवू’, असा विश्वास बाबांच्या निवडणूक कार्यालयाच्या मोठ्या प्रांगणात हुक्का ओढण्यात रमलेल्या समर्थकांनी व्यक्त केला. ‘आम्हा जाटांची इथं दोन-तीन गावं असतील पण, आम्ही बाबांसाठी गावागावांत प्रचार करतो. लोकांना आम्ही सांगतो की, तुम्हाला रामाच्या (बाबा) सेनेत जायचे की, रावणाच्या (इम्रान खान) सेनेत हे तुम्ही ठरवा. त्यांना रामाच्या सेनेतच जायचे आहे’, असे बाबांचे प्रचारक सांगत होते. तिजारा मतदारसंघामध्ये २०० गावे असून ३५० गाड्या बाबांचा प्रचार करत आहेत, असा दावा बाबांच्या कार्यकर्त्याने केला.
‘राजस्थानचे योगी’ अशी बाबांची ओळख निर्माण झाली असून त्यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले होते. योगींनी खास शैलीत हिंदूंना एकत्र येऊन बाबांना विजयी होण्याचे आवाहन केले. तिजाराची जबाबदारी भूपेंद्र यादव यांच्यासारख्या अमित शहांच्या विश्वासू नेत्याकडे देण्यात आली असून यादव आणि शहा यांनी इथे बैठकाही घेतल्या आहेत. हरियाणाच्या रोहतकमधील मस्तनाथ मठाचे मठाधिपती असलेले महंत बाबा बालकनाथ प्रचारामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा कथित मुस्लिम अनुनय, ते आणि आपण, पाकिस्तानविरोध भारत क्रिकेट सामना असे वेगवेगळे उल्लेख करत हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत.
हेही वाचा : भाजपाकडून फार महत्त्व नाही; पण वसंधुरा राजे त्यांच्या बालेकिल्ल्यात अजूनही ‘राणी’
तिजारामध्ये मुस्लिम ७०-७५ हजार असून यादव व दलित मतदार प्रत्येकी सुमारे ४०-४५ हजार आहेत. या शिवाय, गुर्जर, राजपूत, ब्राह्मण व बनिया मतदार आहेत. इथे ‘बसप’च्या उमेदवाराचा प्रभाव राहिला असून मुस्लिम, दलित मतांच्या आधारे विजय निश्चित केला जातो. यावेळी काँग्रेसचे इम्रान खान आणि भाजपचे बाबा बालकनाथ हे तगडे उमेदवार आहेत. तिजारामध्ये यादव भाजपचे प्रमुख मतदार असले तरी, दलितांची किती मते बाबा बालकनाथ खेचून आणतात त्यावर बाबांचा विजय अवलंबून आहे.
‘बाबा बालकनाथ अलवरचे खासदार असले तरी, त्यांचा प्रभाव आत्तापर्यत जाणवला नव्हता. ते कधीही तिजारामध्ये आले नाहीत, त्यांनी कधी विकासाकडे लक्ष दिले नाही’, अशी तक्रार साध्वीने केली. पण, साध्वी बाबांच्या समर्थक असून मुस्लिमांवर वचक ठेवायचा असेल तर बाबांना जिंकून दिले पाहिजे, असे साध्वीचे म्हणणे होते. ‘दलित मतांमध्ये विभागणी होऊ नये, यासाठी बाबा प्रयत्न करत आहेत’, असे बाबांच्या कार्यकर्त्याचे म्हणणे होते. यादव, दलित व इतर समाजातील भाजपचे पारंपरिक मतदार असे विजयाचे गणित भाजपने मांडले असल्याचा दावा बाबांचे समर्थक करत आहेत. पण, मुस्लिम, दलित-आदिवासींनी काँग्रेसचे इम्रान खान यांना कौल दिला तर मात्र भाजपसाठी तिजारा जिंकणे कठीण असेल असे सांगितले जाते.
हेही वाचा : कसबा पेठेतील वातावरण पुन्हा तापले
तिजारामधून ‘बसप’ने इम्रान खान यांना उमेदवारी दिली होती पण, काँग्रेसने इम्रानशी संपर्क साधून पक्षात आणले आणि उमेदवारीही दिली. मेवात भागातील मुस्लिमामध्ये इम्रान खान यांची भक्कम पकड असून हेच इम्रान यांना उमेदवारी देण्यामागील प्रमुख कारण होते. मी भारताचा महम्मद शामी, भारतात पाकिस्तानहून अधिक मुस्लिम, अशी आक्रमक विधाने करून बाबा बालकनाथ यांना आव्हान दिले आहे. राजस्थानातही बुलडोजरवाला मुख्यमंत्री पाहिजे असे म्हणत बाबा बालकनाथांनी अप्रत्यपणे मुख्यमंत्रीपदाची मनीषा व्यक्त केली आहे. राजस्थानातील भाजपच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत बाबा बालकनाथ यांचाही लोकांनी समावेश केला आहे. पण, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असा प्रचार केला तर बाबांचे नुकसान होईल. त्यामुळे बाबांनी सावध राहिले पाहिजे, असे मत साध्वीने व्यक्त केले.