राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एक नाट्यमय घटना घडली आहे. राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. राजकीय गोंधळ आणि संभ्रमावस्था वाढल्यामुळे पुन्हा एकदा आमदार वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या घनश्याम तिवारी यांच्यासह काँग्रेसचे रणदीपसिंग सूरजेवाल, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी यांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपतू असणारे सुभाष चंद्रा यांनी भाजपाच्या पाठिंब्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुभाष चंद्रा यांच्या एंट्रीमुळे राजस्थानमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी आता ५ उमेदवार रिंगणात आहेत. पाचव्या उमेदवाराच्या असण्यामुळे काँग्रेसचे राजकीय आरखडे हवेत विरून गेले आहेत.
काँग्रेसचा भाजपावर गंभीर आरोप
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चंद्रा यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपाकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे भाजपा आता घोडेबाजार करणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.यासोबतच काँग्रेस चारपैकी तीन जागा जिंकणार असून भाजपाने पाचव्या उमेदवाराचा खेळ का खेळाला हे आम्हाला समजत नसल्याचे गेहलोत यांनी सांगितले.
राजस्थानमधील आकड्यांची समीकरणे
प्रत्येक उमेदवारासाठी ४१ मतांसह काँग्रेस आणि भाजप अनुक्रमे प्रत्येकी २ आणि १ राज्यसभेचा उमेदवार अगदी सहज निवडून आणू शकतो. अतिरिक्त जागेसाठी त्यांना त्यांच्या पक्षाबाहेरील आमदारांची मते मिळवावी लागतील. सध्या काँग्रेसकडे १०८ आमदार असून तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त १५ मतांची आवश्यकता आहे. भाजपाकडे ७१ आमदार असून दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना अतिरिक्त ११ मते हवी आहेत. १३ अपक्ष आमदारांपैकी बहुतांश आमदार काँग्रेससोबत आहेत. इतर पक्षांचे ८ आमदार आहेत. या सर्व पक्षांनी त्यांची भूमिका ९ तारखेला स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी इतर छोट्या पक्षांनी खूप साथ दिली आहे त्यामुळे ते भाजपासोबत असल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्ट केले.
सुभाष चंद्रा यांना उमेदवारी
७१ वर्षीय सुबाष चंद्रा हे एस्सेल ग्रुपचे संस्थापक आहेत. झी मीडियाचे अध्यक्ष म्हणुन ओळख आहे. त्यांना मीडिया आणि मनोरंजन, शिक्षण, पायाभूत सुविधा, आर्थिक सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये रस आहे. हरियाणा या त्यांच्या गृहराज्यातून २०१६ साली ते राज्यसभेवर निवडून गेले. ती निवडणूक खूप रंगतदार झाली होती. यावेळी काँग्रेसची काही मते अवैध ठरवल्यामुळे सुभाष चंद्रा यांचा विजय झाला होता.
भाजपाने काँग्रेसचे आरोप फेटाळले
भाजपाचे घोडेबाजाराचे आरोप फेटाळून लावत भाजपाने त्यांच्याकडे अतिरिक्त ३० मते असल्याचा दावा केला आहे. समविचारी पक्ष आणि आमदार यांनी भाजपालाच मते द्यावीत असे आवाहन केले आहे.