नागपूर : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त खासदार पक्षाच्या चिन्हावर निवडून यावेत, यासाठी कंबर कसल्याने महाराष्ट्रातील महायुतीमध्ये अजूनही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. भाजपला येथून कधीही खासदार निवडून पाठवता आलेला नाही. आता रामटेकेचा हा गड उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांना हाताशी धरून सर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामटेक लोकसभेवर अनेक वर्षे काँग्रेसचे प्राबल्य राहिले. त्याला छेद शिवसेनेने दिला. पण, भाजपला येथे स्वबळावर उमेदवार आजवर देता आलेला नाही. एकीकडे नागपूर आणि विदर्भात भाजप मजबूत असल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजप यशस्वी झाले. मात्र, रामटेक लोकसभेवर कब्जा करता आलेला नाही. युतीमुळे ही जागा शिवसेना जात असे, पण आता शिवसेना फुटल्याने या जागेवर भाजपने जोरकस दावेदारी करून रामटेकची कसर दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे पहिल्यांदाच आमदार झालेले राजू पारवे यांना गळाला लावण्याचे संकेत मिळाले आहेत.

हेही वाचा : धुळ्यात डाॅ. सुभाष भामरे यांची भाजप अंतर्गत विरोधकांवर मात

माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंहराव यांनी नेतृत्व केलेल्या रामटेक मतदारसंघ १९५७ पासून १९९८ पर्यंत काँग्रेसचा अभेघ गड मानला जात होता. त्याला शिवसेनेकडून निवडूक लढवत सुबोध मोहिते यांनी छेड दिला. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर मुकुल वासनिक यांनी २००९ मध्ये काँग्रेसला तो मिळवून दिला. त्यानंतर दोनदा शिवेसनेचे कृपाल तुमाने यांनी बाजी मारली. हा ऐतिहासिक रामटेक मतदारसंघ यावेळी भाजपला हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेनंतरही नागपूर जिल्ह्यातील दोन पैकी एक लोकसभा भाजपकडे नसल्याची खंत आहे. त्यामुळे शिवसेनेला दिल्लीतील तहात पराभूत करून ही जागा मिळवण्याचे आणि काँग्रेसच्या आमदाराच्या मदतीने रामटेक गड सर करण्याची रणनिती भाजपची दिसून येत आहे.आमदार राजू पारवे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने यास बळकाटी मिळाली आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईत आहे. त्याच दिवशी किंवा त्यानंतर लगेच राजू पारवे आणि इतर काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश सुनिश्चित करण्याची योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे समजते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ramtek umred congress mla raju parwe likely to be given lok sabha ticket by bjp print politics news css