रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव आघाडीवर असले तरी महाविकास आघाडीतर्फे या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले किरण सामंत यांनीही उमेदवारीसाठी पाठपुरावा चालू ठेवला आहे. हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेकडे असल्यामुळे दीड वर्षापूर्वी झालेल्या फुटीनंतरही सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा या जागेवर हक्क आहे, अशी या गटाची आग्रही भूमिका आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात पाय रोवण्याचा भाजपाचा मनसुबा असल्याने या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सुरुवातीपासून येथे उमेदवारीसाठी शिंदे गटावर दबाव ठेवलेला आहे. त्याचबरोबर पक्षातर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी आमदार प्रमोद जठार इत्यादी नावे उमेदवार म्हणून सतत चर्चेत ठेवली आहेत. त्यापैकी राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त चार दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांमधून ठळकपणे पसरले. पण त्यानंतर अजूनही महायुतीकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही . त्यामुळे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनीही आशा न सोडता उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

गेल्या शुक्रवारी किरण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर रात्री उशीरा बंधू उदय सामंत यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन चर्चा केली. याबाबतचा काही तपशील उघड करण्याचे त्यांनी टाळले आहे. मात्र राणे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसतील तर आपल्या नावाचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी भूमिका त्यांनी पक्षश्रेष्ठींपढे मांडल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेबाबत ते अजूनही ठाम आहेत. दुसरीकडे, राणे यांनी मात्र या सगळ्या धामधुमीत मौन स्वीकारले असून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक नसलो तरी पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आपल्याला मान्य राहील, अशी भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. त्यामुळे हा पेच कायम राहिला आहे.

हेही वाचा : उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा ?

दरम्यान महायुतीच्या काही निवडक जागांबाबत अजून वाद असल्यामुळे अन्यही काही जागांचा निर्णय घोषित झालेला नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना कबूल केले. त्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे येथील महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यास आणखी दोन-तीन दिवस लागू शकतात. त्यानंतरच अखेर या शर्यतीत राणे आणि सामंत यापैकी कोण जिंकले, हे स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ratnagiri sindhudurg lok sabha constituency kiran samant interested to contest lok sabha from mahavikas aghadi print politics news css