रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हा कार्यकारणीच्या पद नियुक्त्या रखडल्याने अनेक नेते पदाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा कार्यकारणीच्या पद नियुक्तीला मुहूर्तच मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारणी पदाविना कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेची रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी बरखास्त करुन एक महिना उलटला तरी नव नियुक्त्या अद्याप ही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले नवीन कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते यांना न्याय देण्यासाठी कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. ही कार्यकारणी बरखास्त करुन पालकमंत्री उदय सामंत यांनी आठ दिवसात पुन्हा कार्यकारणीच्या नियुक्त्या करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे नवीन कार्यकारणीत नवीन- जुने कार्यकर्ते यांचा ताळमेळ घालून फेर नियुक्त्या करण्यात येणार होत्या. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती की, या कार्यकारणीत कोणाकोणाची वर्णी लागणार. मात्र नवीन कार्यकारणीला मुहूर्तच मिळत नसल्याने ही कार्यकारणी कधी स्थापन होणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागुन राहिले आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना ही कार्यकारणी नियुक्त करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटातील जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असणारे तसेच माजी आमदार, जी.प.सदस्य, पं.स. सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात समाविष्ट झाले होते. मात्र या प्रवेशाने शिंदे शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. या सर्वांनाच न्याय देणे अवघड जात असल्याने जिल्हा कार्यकारणीच्या नियुक्त्या रखडल्याचे सांगितले जात आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कार्यकारणीच्या नियुक्त्या जाहीर होण्याची आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र यावेळी ही कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली. वांरवार आढावा बैठका घेतल्या जात असल्या तरी नवीन कार्यकारणी जाहीर होण्यास विलंंब होत असल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत आमदार उदय सामंत यांनी नवीन जुने असे वाद न घालता एकत्रित काम करण्याचा सल्ला दिल्याने कार्यकर्ते संभ्रामावस्थेत सापडले आहेत. पदेच नसल्याने काम कोणत्या स्वरुपाचे करणार? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. शिंदे शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकारणी लवकरच स्थापन होईल अशी आशा कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. मात्र सद्यपरिस्थितीत, ‘तेल ही गेले आणि तुप ही गेले’ अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाली असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना शिंदे गटाची जिल्हा कार्यकारणी कधी स्थापन होणार आणि त्यामध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागुन राहिले आहे. पदे न मिळाल्यास नाराजांची नाराजी दूर करण्यात आमदार उदय सामंत यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचेही बोलले जात आहे.
शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकारणी लवकरच जाहीर होईल. यासाठी आढावा बैठका घेण्यात येत आहेत. सर्वाना समान न्याय देण्याचे काम करण्यात येणार आहे. – राहुल पंडीत, माजी जिल्हा प्रमुख, शिवसेना शिंदे गट.