छत्रपती संभाजीनगर : दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी मोदी जॅकेटची चर्चा होती. आता लाडक्या बहिणींना वाटप होणाऱ्या साड्यांची चलती आहे. त्यांची व्याप्ती एवढी की, दीड महिन्याला साडीच्या दुकानांमध्ये साठवला जाणारा माल फार तर तीन दिवसच पुरतो.

नवरात्रीपूर्वी साडी विक्री वाढतेच पण या वर्षी नेहमीपेक्षा साड्यांच्या विक्रीत १५ ते २० टक्क्यांची वाढ आहे. विशेष म्हणजे या सर्व साड्यांची किंमत एक हजार व त्यापेक्षा कमी आहे. काही लाडक्या बहिणी थोडीशी भर टाकून साडी खरेदी करत आहेत. आता ‘मोदी जॅकेट’ची जादू वेशभूषेमध्ये मोजक्या मंडळींमध्ये रुळली आहे. तालुका पातळीवर घाऊकपणे साडी खरेदीची मागणी वाढली असल्याचे कपडा व्यापारी सांगतात.

हेही वाचा : Ratan Tata: नरेंद्र मोदी ते मोहन भागवत; सर्वपक्षीय पुढाऱ्यांशी संबंध असूनही रतन टाटा राजकारणापासून अलिप्त कसे राहिले?

मराठवाड्यासह राज्यात बहुतांश मतदारसंघांत ‘पैठणीचा खेळ’ सुरू आहे. स्थानिक महायुतीच्या आमदारांनी पैठणीच्या खेळात सढळ हाताने पैठणी वाटण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका आमदारांनी तर लाखभर साड्या एकदाच विकत घेतल्या. घाऊकपणे साड्या घेण्याचे हे प्रमाण नवरात्रीमध्ये अचानक वाढले. बहुतांश साड्या मुंबई व सुरतवरून आणल्या जातात. या साड्यांची किंमत एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे. लाडक्या बहिणीचे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे बँकांमध्ये जमा झाल्यानंतर साड्यांच्या दुकानातील गर्दी वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. बांधकाम कामगारांना साहित्य वाटप, क्रिकेटचे साहित्य आदी वाटपही विविध मतदारसंघांत होत असले तरी साडी वाटपाएवढे त्याचे प्रमाण नाही. ‘महिला मतपेढी’ निर्माण करण्याच्या प्रयोगात घाऊक साड्या वितरणाचे कार्यक्रम गावोगावी होऊ लागले आहेत.

नवरात्रीमध्ये एक हजार रुपयांपर्यंतच्या साड्या विक्री करण्यासाठी दीड महिना लागत असे. आता तो कालावधी तीन किंवा चार दिवसांपर्यंतच राहिला आहे. एवढी विक्रीमध्ये तेजी आहे. कोणत्या कारणामुळे ही साडी विक्री वाढली हे आम्ही सांगू शकत नाही. मात्र, साडी विक्रीच्या व्यावसायात या वर्षी १५ ते २० टक्क्यांची वाढ आहे. – सदाशिव पाटील, कपड्याचे व्यापारी

हेही वाचा : मावळतीचे मोजमाप: अल्पसंख्यांकांचे प्रश्न; राज्यातील अल्पसंख्यांकांच्या समस्यांबद्दल विधानसभा उदासीन

सिल्लोडमध्ये साड्या जाळण्याचा प्रकार

साड्यांचा दर्जा, आणि राजकीय कुरघोड्यांमधील वादातून सिल्लोडमध्ये वाटप करण्यात आलेल्या साड्या जाळण्याचा प्रकारही समोर आला. साड्या वाटप करणारी मंडळी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. बचत गटाच्या माध्यमातून साडी वितरणाची प्रक्रिया राबवली जात आहे.