छत्रपती संभाजीनगर : निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सिल्लोड मतदारसंघातील २३ मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल बन्सी पवार यांनी या संदर्भाने तक्रार दाखल केली असून, त्यावरून सिल्लोड ग्रामीण, सिल्लाेड शहर ठाण्यात अनुक्रमे ९ व ८, तर अजिंठा पाच आणि वडोदबाजार पोलीस ठाण्यात एका मुख्याध्यापकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून मंत्री अब्दुल सत्तार हे काम पाहतात. त्यामुळे त्यांना हा दणकाच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे रघुनाथ घारमोडे यांनी केला आहे.
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अंधारी येथील नॅशनल मराठी हायस्कूलचे हकीम खाँ दौलत खाँ पठाण, हिंदुस्थान ऊर्दू हायस्कूलचे काजी इक्रमोद्दीन, हिंदूस्थान उर्दू प्राथमिक शाळेचे मो. खलील शेख, डोंगरगाव येथील नॅशनल मराठी हायस्कूलचे प्रताप तुकाराम बदर, प्रगती ऊर्दू हायस्कूलचे सरफराज शेख, नॅशनल मराठी प्राथमिक शाळेचे विजय वाघ, किरहाडा येथील नॅशनल ऊर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक (नाव नोंद नाही), घाटनांद्रा येथील नॅशनल मराठी प्राथमिक शाळेचे संदीप विठ्ठल सपकाळ व नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशा वरील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात मगलपुरा येथील अब्दुल रहीम उर्दू प्राथमिक शाळेचे शेख नईम, नॅशनल मराठी प्राथमिक शाळेचे शेख गफार कादर, स्नेहनगरमधील नॅशनल मराठी प्रा. शाळेचे शेख गफार कादर, निकम, अब्दाशानगरमधील शोएब महमद खान, अब्दुल वहीद खान, उर्दू नॅशनल प्राथमिक शाळेचे राजू काकडे, एकनाथ प्राथमिक विद्यालयाचे दिनेश गोंगे व नॅशनल हायस्कूलचे शेख राजिक अहमद निसार अहमद या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर वडोदबाजार पोलीस ठाण्यात नॅशनल मराठी प्रशालेचे मुख्याध्यापक समाधान पांढरे, तर अजिंठा पोलीस ठाण्यात शिवना येथील नॅशनल उर्दू प्राथमिक शाळेचे शेख राजीक शेख सादिक, अजिंठा येथील नॅशनल उर्दू हायस्कूलचे माजेद खान जावेद खान, अंभई येथील उर्दू हायस्कूलचे फईम बेग चांद बेग, हटी येथील गंधेश्वर विद्यालयाचे संजय पूंजाराम श्रीखंडे व पिंपळदरीच्या नॅशनल मराठी विद्यालयाचे लक्ष्मिकांत देविदास निनकुंभ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. वरील सर्व मुख्याध्यापकांवर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ऑनलाइन प्रणालीवर शिक्षक, कर्मचाऱ्यांनी माहिती सादर न केलेल्या शाळा मुख्याध्यापकांवर गुन्हा नोंदवण्याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांचे पत्र प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा : महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
वेळोवेळी लेखी व तोंडी सूचना निवडणूक विभागाकडूनही देण्यात आल्यानंतरही केवळ आपले कर्मचारी आपल्या प्रचारात राहावेत यासाठी शिक्षकांची यादी दिली नाही. त्यामुळेही ही कारवाई करून सत्तार यांना दणका दिल्याचे रघुनाथ घारवाड यांनी म्हटले आहे.
© The Indian Express (P) Ltd