सांगली : माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबरोबर काम करताना मी त्यांना प्रत्येक वेळेस साथ दिली. मात्र ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप माझ्यावर झाला. या फाईलवर गृहमंत्री असताना आबांनी सही करत माझा केसाने गळा कापला, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तासगाव येथे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार माजी खासदार पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, विधान परिषद सदस्य इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष प्रतापनाना पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : ‘मविआ’ सरकारच्या काळातच टाटा एअरबस, अन्य प्रकल्प राज्याबाहेर, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की आबांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत मी त्यांना पाठबळ देत होतो, मागेल ते पद व गोष्टी आबांना मिळवून दिल्या. सिंचन घोटाळ्याचा माझ्यावर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री म्हणून या प्रकरणाची खुली चौकशी करण्यासाठी आबांनी सही केली आणि निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याच्या सहीने त्याची चौकशी सुरू होणार होती. यानंतर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून घेत तुमच्या आबांनी तुमच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सही केली आहे हे मला दाखवले. याचा मला धक्का बसला. आबांनी माझे काय चुकले असेल म्हणून सही केली, असा उद्विग्न सवाल त्यांनी यावेळी केला.

आबांच्या नंतर त्यांच्या कुटुंबाबरोबर आम्ही कायम राहिलो आहे. मात्र नुसत्या बोलण्याने तासगाव मतदारसंघाचा विकास होणार नाही, त्यासाठी धमक नेतृत्वात असावी लागते. असे नेतृत्व संजय काका यांच्यात आहे, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : घर फोडण्याचे पाप कधी केले नाही! अजित पवारांच्या आरोपाला शरद पवारांचे उत्तर

४०० पार घोषणेने आम्हाला दणका

देशभरात व राज्यभरात आमच्या सरकारने लोकांसाठी विविध कामे केली. मात्र ४०० खासदार आल्यावर संविधान बदलणार ही भीती विरोधकांनी जनतेत निर्माण केली. या भीतीने दलित व मुस्लिमांनी आम्हाला नाकारले. अब की बार चारसो पार या घोषणेनेच आम्हाला दणका दिला, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli ajit pawar said that rr patil cheated him in irrigation scam print politics news css