सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत २५ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने आता महाविकास आघाडीत काँग्रेसमध्ये उमेदवारीची चुरस निर्माण झालेली असतानाच महायुतीमधील भाजपमध्येही उमेदवारीसाठीचा संघर्ष सुरू आहे. लोकसभेत घटलेले मतदान यावेळी भाजपच्या बाजूने पुन्हा वळविण्यासाठी चेहरा बदलण्याची गरज भाजपमध्ये व्यक्त होत असून यातून आमदार सुधीर गाडगीळ यांना हॅटट्रिकची संधी मिळणार की भाजप नवा डाव खेळणार याकडे लक्ष लागले आहे. भाजपमधून उमेदवारीसाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे हे प्रयत्नशील असून त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत काँग्रेसला पराभूत करून भाजपने कृष्णाकाठी आपले निशाण लावले. यानंतर झालेल्या सलग दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार गाडगीळ यांनी विजय संपादन केला. मात्र, गतवेळी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा पराभव अल्प मतांनी झाला. यामुळे यावेळी भाजपची राजकीय पावले अत्यंत सावधगिरीची आहेत. यातच मराठा आरक्षणाचा विषयही तापलेला असताना भाजपला सांगलीची जागा कायम ठेवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार असे दिसते. यावेळी माधवनगर, कवलापूर या दोन जिल्हा परिषद गटामध्ये गेली दहा वर्षे आपले वर्चस्व राखणारे शिवाजी डोंगरे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपकडे त्यांनी मागणी केली होती. मात्र, पक्ष नेतृत्वाकडून सबुरीचा सल्ला दिला. यावेळी मात्र, अगोदरपासूनच त्यांनी तयारी सुरू केली आहे. याशिवाय भाजपमधून सांगलीवाडीचे दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार, शेखर इनामदार आणि महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या उमेदवारीच्या संघर्षात कोणाला पक्षाकडून संधी मिळते याबद्दल औत्सुक्य आहे.
हेही वाचा: लोकसभेतील पराभवाची शिंदे गटाकडून परतफेड
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले मतदान झाल्याने माजी मंत्री स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मदन पाटील युवा मंचच्या माध्यमातून यासाठी समाज माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात उमेदवारीसाठी हा गट आग्रही राहण्याची चिन्हे आहेत. तर काँग्रेसचे प्रत्येक आंदोलन स्वत: सहभागी होउन करणारे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा हातातोंडाला आलेला घास दुरावल्याने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही उमेदवारीसाठी आशादायी आहेत. यावेळी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवायची आणि जिंकायचीच यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे सर्वच गट, तट एकत्र आल्याचे चित्र लोकसभेवेळी दिसले, याचा लाभ आता कोणाला मिळतो याकडेही लक्ष आहेच. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे सांगली दौर्यात करण्यात आली. तथापि, सांगलीची जागा लढवायची की नाही याचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनाच राहणार असल्याने त्यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीची दिशा ठरणार आहे.
हेही वाचा : ना किमान समान कार्यक्रम ना समन्वयक! आताची एनडीए वाजपेयींच्या काळापेक्षा वेगळी कशी?
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशीच लढत होणार असली तरी सांगलीत भाजप विरूध्द काँग्रेस अशीच चुरस पाहण्यास मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीचे वातावरण आणि स्थानिक राजकारण यामुळे भाजपचे मताधिक्य कमी झाले असले तरी याचा विधानसभा निवडणुकीवर फारसा प्रभाव पडणार नसल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, मराठा आरक्षणावरून भाजपला अडचणींचा सामना करावा लागेल यामुळे जर चेहरा बदलला तर भाजपला पुन्हा संधी मिळेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद मर्यादित असून शिंदे शिवसेनेच्या हालचाली सध्या तरी थंडच दिसत आहेत.