सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्वात शेवटचा आणि जिल्ह्यात सर्वाधिक विस्तारलेल्या जतमध्ये यावेळी नवीन राजकीय समिकरणे उदयास येण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणी प्रश्‍नामुळे कायम चर्चेत राहिलेला हा मतदार संघ सध्या काँग्रेसकडे असला तरी गतवेळचा पराभव धुउन पुन्हा भाजपकडे खेचण्याचे जिकीरीचे प्रयत्न यावेळी सुरू आहेत. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अलिकडच्या काळात जतमध्ये जास्त लक्ष केंद्रित केल्याने भूमीपुत्र की पार्सल असा वाद येथे भाजपअंतर्गतच पाहण्यास मिळत आहे. तरूण नेतृत्व तमणगोंडा रविपाटील यांनी पडळकर यांना निवडणुकीपुर्वीच जनकल्याण संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षांतर्गतच आव्हान दिले आहे. भाजप अंतर्गत उमेदवारीसाठीचा संघर्ष दिसत असला तरी काँग्रेसचे विद्यमान आमदार विकमसिंह सावंत यांच्यापुढेही कसोटीचा काळ सध्या दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जत तालुका हा विकासाच्या बाबतीत आजअखेर दुर्लक्षित मतदार संघ म्हणून ओळखला जात असला तरी राजकीय पातळीवर सजगता कायम दिसून आली आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी आतापर्यंत या मतदार संघात किंगमेकरची भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. या पराभवाला भाजपचे तत्कालिन खासदार संजयकाका पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांना यावेळी पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष त्याग करीत अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. या त्यांच्या निर्णयाचे अन्य मतदार संघावर भाजपच्या दृष्टीने प्रतिकूल परिणाम होउन भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, अन्य मतदार संघात मताधियय कमी असताना जतमध्ये मात्र भाजपला मताधियय मिळाले.

हेही वाचा :  भाजपा-संघामध्ये तब्बल पाच तासांची बैठक; नव्या अध्यक्षाच्या निवडीबरोबरच ‘या’ विषयावर झाली खलबतं

जतमध्ये भाजपला मताधियय अधिक मिळण्यामागे पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या ६४ गावांसाठी मंजूर झालेली विस्तारित म्हैसाळ योजना हे एक कारण तर आहेच, पण याचबरोबर काँग्रेसबद्दल मतदारांच्या मनात असलेला सूप्त रागही असू शकतो. याचबरोबर जिल्हा बॅकेचे संचालक सरदार पाटील यांचा राजीनामा आणि विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम यांचा राजीनामा त्यांच्या अडचणी वाढविणार्‍या ठरण्याची शययता आहे. मतदारांच्यामध्ये असलेली सुप्त नाराजी, पाण्याबाबत भाजपबद्दल निर्माण झालेली विश्‍वासाची भावना या बाबी परिवर्तनाच्या निदर्शक मानल्या जात आहेत.

हेही वाचा : लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले मताधियय लक्षात घेउन आमदार पडळकर यांनी सुरक्षित मतदार संघ म्हणून जतमध्ये विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. गावपातळीवर आमदार हवा आता नवा असा नारा देउन चाचपणी सुरू केली असली तरी त्यांना अगोदरपासून विधानसभेच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे संचालक तमणगोडा रविपाटील यांचे भाजपची उमेदवारी मिळविण्यापर्यंत आव्हान राहणार आहे. पडळकर यांचा मतदार संघ आटपाडी असताना जतमध्ये का असा सवाल माजी आमदार जगताप यांनी उपस्थित करून रवि पाटील यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला असल्याने पडळकर यांची मैदानापुर्वीच कोंडी झाली आहे. पाटील यांच्या जनकल्याण संवाद यात्रेस जगताप यांच्यासह युवराज निकम,जिल्हा बॅकेेचे संचालक प्रकाश जमदाडे, सरदार पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. भाजपअंतर्गत असलेल्या गट-तटाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli challenge for congress to retain jat assembly constituency gopichand padalkar print politics news css