सांगली : सांगली लोकसभेसाठी उबाठा शिवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून महाविकास आघाडीत पेच निर्माण करत असताना काँग्रेसलाच कोंडीत पकडले आहे. अखेरच्या टप्प्यात हा वाद दिल्लीत गेल्याने जिल्ह्यात तोळामासा प्रकृर्तीच्या ठाकरे शिवसेनेचीही घालमेल झाली आहे. जर काँग्रेसने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला तर ठाकरे गटाचीही अवस्था हात दाखवून अवलक्षण अशीच होणार असून पर्याय म्हणून मैदानात जर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश शेंडगे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला तर सांगलीची निवडणूक रंगतदार होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे शिवसेनेने यादी जाहीर करत असताना पैलवान पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर खर्‍या अर्थाने काँग्रेसला जाग आली असेच म्हणावे लागेल. कारण तोपर्यंत मविआच्या बैठकीत सहभागी असलेल्या काँग्रेसचे नेते सांगलीच्या जागेवर हक्क सांगायला कमी पडले असाच याचा अर्थ होतो. मोठ्या युध्दावर निघालेली काँग्रेस युध्द न करताच तहाच्या बोलण्यात फसली असावी अशी शंका येत आहे. सांगलीच्या काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता. तो आग्रह डावलून ठाकरे शिवसेनेने सांगलीच्या जागेसाठी परस्पर उमेदवार जाहीर केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

हेही वाचा : सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी

आता अखेरच्या टप्प्यात काँग्रेस अधिक आक्रमक झाली असून वेळ आलीच तर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारण्यास तयार असल्याचे डॉ. कदम यांनी वरिष्ठांना सांगितले आहे. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांकडून मैत्रीपूर्ण लढतीसाठी अद्याप अनुकूलता दर्शवलेली नाही. मैत्रीपूर्ण लढतीचे अन्य मतदार संघावरही परिणाम होउ शकतात असा इशारा सेनेकडून देण्यात येत आहे. यामुळे इष्ट आणि अनिष्ट परिणामाचा विचार करूनच सांगलीच्या जागेबाबत निर्णय वरिष्ठाकडून घेतला जाईल. जर पक्षाने मैत्रीपूर्ण लढतीसाठी हिरवा कंदिल दर्शवला नाही तर डॉ. कदम यांनाच जिल्ह्यातील काँग्रेसच्या भवितव्यासाठी बंडखोरीचा विचार करावा लागेल. बंडखोरी यशस्वी झाली तर सगळी पाप धुतली जातील, आणि बंडखोरीचा जर मविआला फटका बसला तर त्याचे खापर जिल्हा काँग्रेसवरच फोडले जाईल. राजकीय भवितव्याचा विचार करत असताना या बाबींचाही विचार करावा लागेल.

मैत्रीपूर्ण लढत झाली तर प्रदेश पातळीवरील नेते प्रचारासाठी उपलब्ध होतील आणि पक्षाचे चिन्हही उमेदवाराला मिळेल. आणि जर बंडखोरी करायची वेळ आली तर सांगलीमधून सलग दोन निवडणुकीमध्ये मतदान यंत्रावर पक्षाच्या हात या निशाणीचे अस्तित्वच दिसणार नाही. बंडखोरीला ठाकरे सेनेकडून प्रखर विरोध तर होणारच आहे. याच बरोबर पारंपारिक विरोधक असलेल्या भाजपकडूनही तुम्हाला तुमची हक्काची जागा वाचविता येत नसेल तर नेतृत्व कशाला करता असा सवाल उपस्थित केला जाऊ शकतो. भाजपमधील नाराज नेत्यांची ताकद बंडखोरीमागे उभी करण्यासाठी पडद्याआडच्या तडजोडी करत असताना अनावश्यक ताकद खर्ची पडणार आहे. अपक्ष निवडून येउन सत्तेच्या पारड्यात फारसे महत्व मिळेलच याचीही खात्री देता येणार नाही. बंडखोरीचा फटका नेतृत्व करणार्‍या डॉ. कदम यांनाच अधिक बसणार आहे. कारण आणखी चार महिन्यात सुरू होणार्‍या विधानसभेच्या रणधुमाळी वेळी बंडाचे भूत उतरविण्यासाठी यातायात करावी लागेल.

हेही वाचा : चावडी: शुक्राचार्य कोण ?

सांगली मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १९ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. तोपर्यंत हा तिढा सुटला तरच प्रचाराची यंत्रणा उभी करण्यातीलअडथळे दूर करता येणार आहेत. कार्यकर्तेही अजून उमेदवारीचे कुठं शाश्‍वत आहे अशी विचारणा करून प्रचाराच्या कामात सहभागी होण्यास टाळाटाळ करीत आहेत. उमेदवारीचा तिढा लवकर सुटावा ही जशी काँग्रेसची गरज आहे त्यापेक्षा अधिक गरज ठाकरे शिवसेनेची आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli congress aggressive against uddhav thackeray s shivsena candidate chandrahar patil print politics news css