सांगली : सांगली लोकसभा मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील यांचा प्रचार केला म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदाचा राजीनामा देण्याचा आदेश पत्रकार बैठकीच्या माध्यमातून दिला. त्यानुसार पाटील यांनी संचालक पदाचा राजीनामाही दिला. गोष्ट एवढ्यावरच थांबती तर त्यामध्ये वेधक ना ठरती, पण त्यांच्याकडून तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसू शकतो ही बाब आता लक्षात घेतली नाही तर आमदार सावंत यांनी दुसर्यासाठी विणलेल्या जाळ्यात ते स्वत:च अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जतचे पाटील हे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांना सभापती पद देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र, महापालिका निवडणुकीत महापौर निवडीवेळी भाजपचा झालेला पराभव लक्षात घेउन भाजप नेत्यांनी जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल टाळला. यामुळे एक वर्षासाठी मिळालेले पद सलग अडीच वर्षे मिळाले. यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेसच्या तंबूत प्रवेश केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खुद्द काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत हे पराभूत झाले. विकास सोसायटी गटातून त्यांचा तीन मतांनी पराभव झाला. त्यांच्या ठिकाणी भाजपप्रणित पॅनेलचे प्रकाश जमदाडे हे विजयी झाले. मात्र, काँगे्रेसला एक स्वीकृत संचालक निवडीची संधी मिळताच आमदार सावंत यांनीच पाटील यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यांना संचालक पद मिळाले.
हेही वाचा : काँग्रेसचे आमदार फोडून सत्तेवर आलेल्या भाजपामध्ये धुसफूस; पुडुचेरीमध्ये काय घडतंय?
मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील यांनी भाजपचा प्रचार केला. यामुळे त्यांना जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदाचा राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला. त्यांनीही काहीही आढेवेढे न घेता राजीनामा दिला असला तरी तो देत असताना उपस्थित केलेले मुद्दे करण्यासारखे आहेत. काँग्रेस ज्या महाविकास आघाडीत आहे त्या आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील होते. मात्र, त्यासाठी राजीनामा न मागता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार का केला नाही म्हणून राजीनामा मागणे कितपत योग्य होते. आघाडी धर्माचे पालन केले नाही म्हणून शिवसेनेचे खा. संजय राउत यांनीही कारवाईची वारंवार मागणी केली तरी कारवाई झाली नाही, आता तर खासदार पाटील काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत.
दुसर्या बाजूला माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत अपक्ष उमेदवाराचा जाहीर प्रचार केला. आता भाजपचे उमेदवार खा.संजयकाका पाटील नको म्हणून त्यांनी पक्षाचा राजीनामा देत उघड पक्ष विरोधी भूमिका घेतली. त्यांचा राजीनामा मंजूर झाला का, पक्षाने काय कारवाई केली या बाबी आता चर्चेतही नाहीत. कारण त्यांची मदत घेतल्या विना भाजपला जतमध्ये यशाची अपेक्षाच करता येणार नाही. यामुळेच पक्षाने त्यांच्याबाबत बोटचेपी भूमिका सध्या घेतल्याचे दिसते.
हेही वाचा : काँग्रेसने मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे मोदींचे वक्तव्य; काय आहे इतिहास?
जत विधानसभेसाठी काँग्रेस विरूध्द भाजप असाच सामना होण्याची चिन्हे आहेत. जगताप यांनी पक्ष सोडला असल्याने अनेकांना आता आमदारकीच ेवेध लागले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत अन्य पाच विधानसभा मतदार संघात मागे असलेले भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना मताधियय मिळाले आहे. यामुळे या मतदार संघात भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची संख्या वाढत आहे. प्रचार प्रमुख तमणगोंंडा रविपाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून या मतदार संघात आमदारकीची तयारी सुरू केली आहे. तर लोकसभा निवडणुकीत पक्ष प्रवेश केलेल्या प्रकाश जमदाडे यांनाही आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. दुसर्या बाजूला आटपाडीतून येउन आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या मतदार संधात प्रतिनिधीत्वसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या साठमारीत उमेदवारी कुणाला मिळणार यावर काँग्रेसच्या जहाजाची दिशा ठरणार आहे. यात संचालक पदाचा राजीनामा हा कळीचा मुद्दा भविष्यात ठरू शकतो.