सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून अद्याप उमेदवारीसाठी चाचपणी सुरू असताना सांगली मतदार संघातून निवडणुकीच्या फडात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. सर्वच पक्षांनी आपल्याशी संपर्क साधला असला तरी अद्याप आपण कोणत्या पक्षाकडून मैदानात उतरणार याबाबतचे मौन पाळले आहे.
सर्वच पक्षांशी आपण समान अंतर राखून मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तर भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी पक्षांतर्गत मतभेदावर उपाय शोधण्यासाठी आतापासून विरोधी पक्षातील मित्रांना आपलेसे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसची उमेदवारी वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनाच मिळण्याचे संकेत खुद्द माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले असले तरी त्यांनीही डावपेच आखण्यासाठी कदमांचे निकटचे प्रतिस्पर्धी असलेल्या कडेगावच्या देशमुख गटाशी संधान साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा… गडचिरोलीमध्ये मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची भाजपकडून कोंडी ?
खानापूर तालुक्यातील भाळवणीचे पैलवान चंद्रहार पाटील यांनी रक्तदान चळवळीच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वच गावांशी गेल्या तीन चार महिन्यापासून संपर्क सुरू केला आहे. आता नोव्हेंबरमध्ये प्रत्येक तालुक्यातील शंभर युवकांना सोबत घेउन दिल्लीत जाउन महारक्तदान शिबीराचे नियोजन केले आहे. या निमित्ताने लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये त्यांचे संपर्क अभियान जोमाने सुरू आहे. पुढील महिन्यात जिल्ह्यातील एक हजार युवकांना आर्मी रक्तदाता एक्सप्रेसच्या माध्यमातून दिल्ली दर्शनाचे नियोजन करण्यात येत आहे. यापुर्वी देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून त्यांनी शर्यत शौकिनांचे लक्ष वेधून घेतले होते. आता रक्तदानाच्या निमित्ताने युवकांना सैनिकांसाठी महारक्तदान यांत्रेचे आयोजन करण्यात येत आहे. १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील सैनिकी इस्पितळामध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने पैलवान पाटील यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणारच अशी घोषणा करीत असताना सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याशी संपर्क साधला असल्याचे जाहीर केल्याने भाजप, काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीमध्येही गोंधळाची स्थिती निर्माण होणे शक्य आहे. मात्र, आखाड्यातील पैलवान जसे कुस्तीचे गुगली डाव मारून प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याचे प्रयत्न करतो तसाच हा गुगलीचा प्रकार असू शकतो अशीही समजूत इंडिया आणि एनडीएमधून इच्छुकांनी करून घेतली असल्यास वावगे म्हणता येणार नाही. मात्र, इच्छुकांनाही जमिनीवर आणण्यास पैलवानांचा डाव नामी ठरू शकतो. लोकसभेच्या आखाड्यात आता डबल महाराष्ट्र केसरी उतरणार असल्याने सांगलीच्या मैदानात तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट होउ लागले आहे. गत निवडणुकीवेळी काँग्रेसच्या कचखाउपणामुळे प्रारंभीच्या काळात भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणुक अखेरच्या टप्प्यात चुरशीची आणि तिरंगी झाली होती. अखरेच्या क्षणी काँग्रेसने सांगलीची जागा मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देत असताना उसनवारीवर उमेदवारही दिला होता. तर स्वाभिमानीच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारीवर मैदानात उडी घेउन लक्ष वेधी मते घेतली होती. वंचित आघाडीच्या उमेदवारीमुळेच काँग्रेसला या मतदार संघात दुसर्यांदा पराभव पत्करावा लागला होता.
हेही वाचा… शरद पवार की अजित पवार? ऊसतोडणी दरवाढीबाबत कामगारांसमोर मोठा प्रश्न
भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील तिसर्यांदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यासाठी मतदार संघातील संपर्क त्यांनी वाढविला आहे. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करण्यासाठी काँग्रेसमधील कच्चे दुवे शोधून नवे मित्र जोडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अगोदर त्यांना पक्षांतर्गत लढा द्यावा लागणार आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते सर्वकाही सुरूळीत करतील अशी समज असला तरी आतून बरेच पोखरले गेले आहे याचीही जाणीव त्यांना आहे. यामुळे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांना पक्षांतर्गत असलेला विरोधक आपलास करण्याचा प्रयत्न खासदारांकडून सुरू आहे. याचीच प्रचिती दोन दिवसापुर्वी जत दौऱ्यात आली. काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना सोबत घेउन कर्नाटकातून आलेल्या तुबची बबलेश्वर पाण्याची पाहणी करून दुष्काळी जतसाठी या योजनेचे पाणी मिळविण्याचे प्रयत्न आमदार सावंत यांना सोबत घेउन करू असे आश्वासन देउन मतांच्या वजाबाकीमध्ये बेरीज करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दुसर्या बाजूला काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी खासदारांचे पक्षातंर्गत विरोधक पृथ्वीराज देशमुख यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. कडेगाव तालुक्यत एका कार्यक्रमात त्यांनी देशमुखांना दादा घराण्याशी असलेला जुना दोस्ताना याद करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्या कदमांनी सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा पक्षाशी वायदा केला आहे त्या विश्वजित कदम यांचेही देशमुख पारंपारिक विरोधक आहेत. यामुळे खुल्या व्यासपीठावर दिसणारे आणि पडद्यामागच्या हालचाली वेगळेच संकेत देणारे ठरणार आहेत हेही विसरून चालणार नाही.