सांंगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली असली तरी यावेळी खानापूर-आटपाडी या स्व. अनिल बाबर यांच्या मतदार संघात सर्वच पक्षांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. अनिलभाउंच्या निधनानंतर या मतदार संघावर प्रभुत्व राखण्यासाठी बाबर गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर ताकदीने मेदानात उतरले असून त्यांना यावेळी केवळ आणि केवळ जिंकण्याच्या जिद्दीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदार संघातून काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांना मिळालेले मताधिक्य नजरेसमोर ठेवून या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच काँग्रेसचे नेते आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणण्याचा चंग बांधला असून या हेतूने या मतदार संघातून डॉ. जितेश कदम यांनी चाचपणी सुरू केली आहे.
टेंभू योजनेच्या पाण्यावर या मतदार संघाचे राजकारण १९९५ पासून होत आले. भाजप-शिवसेना या बिगर काँग्रेस विचारांचे सरकार १९९५ मध्ये राज्यात सत्तेवर आले, त्यावेळी जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी, तत्कालिन वांगी-भिलवडी, कवठेमहांकाळ, शिराळा आणि जत या पाच मतदार संघातून पाच आमदार निवडून आले होते. त्यावेळी या पाच पांडवांनी म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू या योजनेसाठी युती सरकारला पाठिंबा दिला आणि या सिंचन योजनांना खर्या अर्थाने गती मिळाली. गेल्या दोन दशकात या योजनांचे पाणी दुष्काळी टापूत फिरल्याने जसे अर्थकारण बदलले तसे राजकारणही बदलत गेले.स्व. बाबर यांनी टेंभू योजनेसाठी आग्रह धरत राजकीय तडजोडी करत सहाव्या टप्प्याचा आग्रह धरला. आता या योजनेला मंजुरीही मिळाली असून साडेपाच हजार कोटींच्या खर्चाच्या सहाव्या टप्प्याच्या पूर्तीनंतर मतदार संघातील एकही गाव कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही. या भरवस्यावर सध्या बाबर गट मतदारांना सामोरा जात आहे. गेल्या पाच वर्षात हजारो कोटी रूपये विकास कामावर खर्च केले असून भाउंंच्या पश्चात हा गट पुन्हा ताकदीने उभे करणे आणि मतदार संधावर प्रभुत्व राखणे हेच बदलत्या राजकीय स्थितीत सुहास बाबर यांचे ध्येय आहे.
हेही वाचा : ना कुणाशी मैत्री, ना शत्रुत्व; राजकीय विजनवासात गेलेल्या रालोद पक्षाने कशी घेतली उभारी?
या मतदार संघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हेही आमदारकीसाठी नशिब अजमावण्याचा प्रयत्न करत असले तरी विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असे नाही. आटपाडी तालुक्यातही पडळकर गटाची जी ताकद दिसते त्याला माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या गटाची सूज आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र, गेल्या आठ-दहा वर्षात देशमुख गट माणगंगा कारखाना, सूतगिरणी यामध्येच अडकला असल्याने ही ताकद मर्यादित झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची धनगाव पाणी योजनाही बदलत्या राजकीय परिस्थितीत पूर्ण होउ शकली नाही. त्यांचीही राजकीय भूमिका अद्याप अस्पष्ट असल्याने पडळकर गटाला फारसी संधी सद्यस्थितीत दिसत नाही.
याशिवाय या मतदार संघात येउन विधानसभेत जाण्याच्या तयारीत असलेले डॉ. जितेश कदम यांनी एकेकाळी सांगली लोकसभेची तयारी चालविली होती. त्यानंतर कधी सांगली विधानसभेसाठी संधी मिळते काय याची चाचपणी केली. मात्र, पलूस-कडेगावमध्ये तर विश्वजित कदमामुळे संधी मिळणे महाकठिण म्हणून आता खानापूरचा रस्ता शोधला आहे. मात्र, उपर्यांना या मतदार संघात फारसे स्थान मिळेलच याची खात्री दिसत नाही.
हेही वाचा : १८ व्या लोकसभेला उपाध्यक्ष असणार; विरोधकांना पद देण्याची काँग्रेसची मागणी
विट्याचे माजी नगराध्यक्ष पाटील हे कोणत्याही स्थितीत विधानसभेत जायचेच या जिद्दीने तयारीत आहेत. यासाठी तासगाव तालुकयातील विसापूर मंडळाच्या गावातील राबता वाढला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर राजकीय ताकदही वाढविण्याचा प्रयत्न आटपाडी तालुकयात सुरू आहे. यामुळे या मतदार संघात खरी लढत बाबर विरूध्द पाटील अशीच होण्याची चिन्हे दिसत आहेत. उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि लोकसभा निवडणूक लढविलेले पैलवान चंद्रहार पाटील हे दोघेही याच मतदार संघातील आहेत. महायुतीमध्ये शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीतून उबाठाला ही जागा अग्रहक्काने पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होतील. यानंतर या मतदार संघातील चित्र स्पष्ट होणार असले तरी जागा वाटपापुर्वीच या मतदार संघातील बाबर- पाटील अशी लढत मतदारांनी गृहित धरली आहे.