सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सांगली मतदार संघात जशी महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे तशीच रस्सीखेच भाजपमध्येही सुरू आहे. यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यातील उमेदवारीची सुरू असलेला संघर्ष बंडखोरीच्या दिशेने जातो की मविआ विरूध्द भाजप असा सामना रंगतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मैदानात उतरून माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी लक्ष्यवेधी विजय संपादन केल्यानंतर याच घराण्यातील धाकटी पाती म्हणून ओळखल्या जाणार्या स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या विधानसभेच्या तयारीला लागल्या आहेत. त्यांच्यासाठी मदन पाटील युवा मंचने कंबर कसली असून गत निवडणुकीत निसटता पराभव पदरी आलेल्या शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना आता निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारीसाठी मोठा संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. लोकसभेवेळी एकसंघ काँग्रेस जनतेसमोर अपक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरी गेल्याचे चित्र होते. याचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्याकडे होते. आता मात्र, विधानसभेच्या उमेदवारीवेळी राजकीय वजन कोणाच्या पारड्यात टाकावे असा प्रश्न डॉ. कदम यांच्याबरोबर खासदार विशाल पाटील यांच्यासमोर उभा ठाकणार आहे.
हेही वाचा : मराठा आरक्षणाचा निर्णय पंतप्रधानांनीच घ्यावा; आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी चेंडू पंतप्रधान मोदींकडे टोलावला
लोकसभेमध्ये सांगलीत भाजपचे मतदान घटल्याचे आणि गतवेळच्या निवडणुकीमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांना निसटता विजय मिळाल्याने यावेळी होणारी निवडणुक चुरशीची तर होणारच पण, अपक्ष उमेदवाराला मिळालेली मते पाहून अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार असतानाही कारवाईची तमा न बाळगता काँग्रेस कार्यकर्ते अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहिल्याने सांगलीत काँग्रेसला विजयाची आशा निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या सांगलीवाडीचे दिनकर पाटील वगळता या मतदार संघात स्व. वसंतदादा यांच्यानंतर काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही. कधी जनता दल, कधी भाजप या पक्षाकडून स्व.संभाजी पवार यांनी आमदारकी मिळवली होती. यामुळे हा मतदार संघ पारंपारिक काँग्रेसचा राहिला आहे असेही ठामपणे म्हणता येत नसले तरी महापालिकेत स्व. मदन पाटील यांच्या विचाराचे बहुसंख्य नगरसेवक सातत्याने निवडून आले आहेत.
शिवसेनेना ठाकरे गटानेही सांगलीच्या जागेवर दावा केला असून जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्याकडूनही उमेदवारीसाठी दावा केला जात आहे. यामुळे मविआमधील घटक पक्षात सुरू असलेला उमेदवारीचा संघर्ष अधिक तीव्र स्वरूपाचा यापुढे होत जाणार आहे. जर घटक पक्षात जागा वाटपात तडजोड झाली आणि एखाद्या पक्षाला उमेदवारी मिळालीच तर अन्य घटक पक्षाकडून प्रामाणिकपणे साथ दिली जाईलच याचीही सद्यस्थितीत खात्री देता येत नाही.
हेही वाचा : तमिळनाडूमध्ये महिनाभरात ५ राजकीय कार्यकर्त्यांची हत्या; काय आहे कारण?
सध्या सांगलीचे प्रतिनिधीत्व भाजपचे सुधीर गाडगीळ हे तिसर्यांदा मैदानात उतरण्याची तयारी करत असतानाच शेखर इनामदार, नीता केळकर, दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार ही मंडळी उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे हेही भाजपच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. माधवनगर, बुधगाव परिसरात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली विकास कामाच्या जोरावर आणि महापालिका क्षेत्रात असलेला रोजचा संपर्क या आधारावर त्यांनीही उमेदवारीसाठी ताकद लावली आहे.