सांगली : एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना सांगली जिल्ह्यातील जत व मिरज या विधानसभा मतदार संघांवर जनसुराज्य शक्ती पक्षाने दावा करून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याच नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न चालविले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवत असताना कोणत्याही जागेची मागणी न करता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मदत करण्याचे मान्य करत जनसुराज्य शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी मिरज येथे झालेल्या युवा संवाद मेळाव्यात विधानसभेच्या सात जागांची मागणी केली आहे. सध्या तरी भाजप अबकी बार चारसो पारच्या नादात असल्याने जनसुराज्य पक्षाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तथापि, १६ घटक पक्षाच्या महायुतीमध्ये प्रत्येकाला सत्तेत वाटा हवा असून यासाठी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दबाव निर्माण करून शब्द घेण्याचे प्रयत्न दिसत आहेत.
कोल्हापूरातील काही मतदार संघापुरता मर्यादित असा समज असलेल्या जनसुराज्य शक्तीने राज्यात महायुतीचे सरकार येताच आपला पाया मजबूत करत अन्य ठिकाणी बस्तान बसविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पक्ष विस्तार करण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार असल्याने सत्तेच्या सावलीमध्ये पक्ष विस्तार करत असताना आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. जनसुराज्य शक्तीचा मिरजेत युवा संवाद मेळावा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आयोजित करून राजकीय ताकद दाखविण्याचा आणि पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार कोरे यांचे पाठबळ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. युवा संवाद मेळाव्याच्या निमित्ताने काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही चांगभलच्या गजरात करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण धेंडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद पुजारी, कुपवाडचे शहराध्यक्ष कासम मुा, सलीम पठाण, केतल कलगुटगी, अल्ताफ रोहिले, सुशांत काळे, अविनाश भगत, शंकर चव्हाण, डॉ. संगीता सातपुते आदींचा समावेश आहे.
हेही वाचा : अकोला पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस आणि ठाकरे गट लढण्यावर ठाम
जनसुराज्यने यापुर्वी मिरज मतदार संघात आपला उमेदवार उभा केला होता. फारसे यश त्यावेळी मिळाले नसले तरी मतदार संघात असलेल्या लिंगायत समाजात आजही या पक्षाला स्थान आहे. अलिकडच्या काळात प्रदेशाध्यक्ष कदम यांनीही पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि सर्व समावेशक पक्ष होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत अन्य समाजालाही ताकद देण्याचा प्रयत्न केला. राज्य शासनाने लिंगायत समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करून या लिंगायत समाजाला दिलासा देण्याचे काम केले आहे. यामागे जनसुराज्यची आग्रही भूमिका महत्वाची ठरली आहे. मिरज व जत मतदार संघामध्ये या समाजाचे प्राबल्य अधिक असल्याने यापुर्वी या जनसुराज्यने राष्ट्रवादीसोबत जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पदही बसवराज पाटील यांच्या माध्यमातून भुषविले आहे. यामुळे जनसुराज्य शक्तीची ताकद विस्तारण्याची नव्याने संधी निर्माण झाली असून त्याचा लाभ मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
हेही वाचा : अटकेविरोधात काँग्रेसचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी, पण पंजाबमध्ये मात्र…
जनसुराज्यने मिरज व जत विधानसभेवर दावा केला आहे. सध्या मिरजेचे प्रतिनिधीत्व भाजपकडे आहे. जिल्ह्यात भाजपचे पहिल्यांदाा कमळ फुलविणारे म्हणून पालकमंत्री खाडे यांचे पक्षात जेष्ठत्व आहे. 2009 पासून सलगपणे मिरजेचे नेतृत्व त्यांच्याकडेच आहे. त्यांच्या नेतृत्वाला भाजपमधून कधीही आव्हान दिले गेलेले नाही. मात्र, जनसुराज्यमुळे पहिल्यांदाच आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मिरज मतदार संघ अनुसिूचत जाती जमातीसाठी आरक्षित आहे. यामुळे राखीव मतदार संघातच जनसुराज्यकडून आव्हान निर्माण करण्याचा होत असलेला प्रयत्न विधानसभा निवडणुकीवेळी खाडे यांची राजकीय कोंडी ठरण्याची शययता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीत ठामपणे भाजपच्या विचाराला सक्रिय पाठिंबा देणारा जनसुराज्य विधानसभेवेळी कोणती भूमिका घेणार हे लोकसभेचे रणांगण संपल्यानंतर दिसेलच, पण सध्या तरी या पक्षाची वाटचाल दबावाच्या राजकारणाच्या दिशेने सुरू आहे. याला छेद देण्यासाठी पालकमंत्री खाडे कशी व्यूहरचना करतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.