सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघावर दावा केला आहे. विद्यमान खासदार शिवसेनेचे असल्याने ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्यालाच जाणार हे गृहित असताना महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच या उमेदवारीची मागणी केली आहे. या मतदार संघातून सध्या तरी स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी तयारी सुरू केली असून त्यांच्या विरोधात कोण उमेदवार येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सर्जा-राजाची जोडी म्हणून उेख असलेल्या शेट्टी आणि खोत यांच्यात सामना या मतदार संघात लागला तर तो रंगतदारच होईल. मात्र, सध्या जर-तरवर हे सारे अवलंबुन आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातकणंगले मतदार संघामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. उर्वरित चार मतदार संघ कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. यामुळे मतदारांची संख्या ही कोल्हापूर जिल्ह्यातील अधिक असली तरी नातेसंबंध आणि रोजचे व्यवहार हे सांगलीपेक्षा अधिक कोल्हापूरशी निगडीत आहेत. अगदी शिराळा तालुययाच्या लगत असलेल्या शाहूवाडीचाही भाग या मतदार संघात असून साखर कारखानदारीतील राजकारणही या मतदार संघात प्रभावशाली आहे.

हेही वाचा : रवी राणा, बच्‍चू कडूंमधील वाद पुन्‍हा चव्‍हाट्यावर 

माजी खासदार शेट्टी यांनी एकला चलोची भूमिका यापुर्वीच जाहीर केली असली तरी इंडिया आघाडीशी बोलणी सुरू असल्याने त्यांची उमेदवारी नक्की कोणाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंडिया आघाडीकडून जरी ते मैदानात आले तरी चिन्ह स्वत:चेच असणार आहे. यामुळे त्यांनी गावभेटीवर सध्या भर दिला आहे. इंडिया आघाडीतून हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला मिळण्याची चिन्हे असून या पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आपले पुत्र तथा राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांना मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यादृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांवर NSA अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयावर खट्टर सरकारकडून यू-टर्न; नेमके कारण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झालेले धैर्यशील माने हे पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत असून शिवसेनेचा या जागेवर हयक असल्याचे सांगत त्यांनी तयारीही सुरू केली आहे. भाजपने ही जागा शिवसेनेला सोडण्याचे जवळजवळ निश्‍चित केले आहे. यामुळे अन्य घटक पक्षाला ही जागा मिळण्याची सुतराम शक्यता सद्यस्थितीत दिसत नसताना महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा घेउन रयत क्रांती संघटनेचे संस्थापक खोत यांनी आपले राजकीय वजन अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला आहे हे स्पष्ट आहे. आमदारकीची मुदत संपल्यानंतर भाजपच्यादृष्टीने रयत क्रांतीचे महत्व फारसे उरलेले नाही हे गेल्या काही घटनावरून स्पष्ट होते. पालकमंत्री आपले ऐकत नसल्याचा आरोपही खोत यांनी केला होता. सत्तेमध्ये अपेक्षित वाटा मिळत नसल्याचीही त्यांनी तक्रार महायुतीच्या बैठकीत केली होती. रयत क्रांती संघटनेची ताकदही मर्यादित असल्याने त्यांच्या मागणीला आणि म्हणण्याला भाजपच्यादृष्टीने सद्य स्थितीत लक्ष देण्याची गरज भासत नसावी. यामुळेच आपले महत्व लक्षात यावे यासाठी घटक पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्ताने ताकद दाखविण्याचा प्रयत्न एवढेच याला महत्व असावे.

हेही वाचा : पक्षाला जनतेत पोहोचवण्यासाठी नितीश कुमारांची धडपड; एनडीएप्रवेशानंतरही बिहारसाठी ‘विशेष दर्जा’ची मागणी

महायुती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून खोत यांना विधानपरिषदेची उमेदवारी आणि राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र, २०१९ च्या निवडणुकीनंतर या मित्रांची गरज कमी झाल्याने भाजपने दुर्लक्ष केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचे नेतृत्व आमदार पडळकर यांच्या सोबतीने खोत यांनी केले होते. मात्र, ना मूळ प्रश्‍न सुटला ना राजकीय पुनर्वसन झाले हे खरी वेदना आहे. ही वेदनाच राज्यकर्त्यांच्या ध्यानी आणून देण्याचे काम या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले असेच म्हणावे लागेल. निदान यावेळी लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर विधानसभा निवडणुकीवेळी आपले नाव चर्चेत असावे हाच हेतू यामागे असावा अशी शंका वाटते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli sadabhau khot claims hatkanangale lok sabha seat in mahayuti challenges eknath shinde s shivsena print politics news css
Show comments