सांंगली : सांगली लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत झालेली तिरंगी लढत भाजपच्या फायद्याची ठरली होती. आता पुन्हाही हाच खेळ होतो की काय अशी परिस्थिती निर्माण होत असून भाजप अंतर्गत असलेल्या नाराजीचा फायदा काँग्रेस कसा मिळवणार हाच यावेळच्या निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी निवडणूक तयारी सुरू केली असली तरी भाजप अंतर्गत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही पहिल्यांदा उमेदवारीसाठी पक्षाअंतर्गत संघर्ष करीत मैदानात उतरण्याची तयारी ठेवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा पर्यायाने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९६२ पासून २०१४ पर्यंत या मतदारसंघातून कायम काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी मोदी लाटेमध्ये काँग्रेसचा गड नेस्तनाबूत करीत भाजपने या ठिकाणी विजयी पताका संजय पाटील यांच्या माध्यमातून रोवली. ही विजयाची परंपरा २०१९ मध्ये कायम राखत पाटील यांना पुन्हा संधी मिळाली. मात्र, यावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय वसंतदादा घराण्यातून लवकर झाला नाही. या दिरंगाईमध्ये विकास आघाडीने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. स्वाभिमानीने काँग्रेसकडूनच विशाल पाटील यांच्या उसन्या उमेदवारीवर ही निवडणूक लढवली. तर या वेळी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने आमदार गोपीचंद पडळकर हे मैदानात उतरले होते. भाजप विरोधातील मतदान आघाडीच्या उमेदवाराकडे वळू नये याचा फटका भाजपला बसू शकतो याची जाणीव भाजप नेतृत्वाला होती. यामुळे बहुजन वंचित आघाडीचे पडळकर यांनी तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली. याचा फटका आघाडीच्या उमेदवारांला बसला. परिणामी भाजपचा विजय अधिक सुकर झाला.

हेही वाचा – मल्लिकार्जुन खरगेंची नरेंद्र मोदी, भाजपावर टीका; म्हणाले, “मोदींनी मतांसाठी…”

यावेळी राजकीय स्थिती मात्र बदलली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील घटक पक्षाची ताकदही भाजपच्या उमेदवाराला मिळणार असली तरी खुद्द भाजपमध्ये विद्यमान खासदार पाटील यांच्या विरोधी भाजप नेत्यांचा कल दिसून येतो आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, मिरज आणि सांगली. यापैकी सांगली व मिरजेचे प्रतिनिधित्व भाजपकडे तर पलूस-कडेगाव आणि जतचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आणि खासदारचा गड मानला जाणारा तासगाव राष्ट्रवादीकडे अशी स्थिती आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे खानापूर-आटपाडीचा मतदारसंघ आहे. यापैकी बर्‍याच ठिकाणी खासदार पाटील यांच्या विरोधात पक्षाअंतर्गत गटबाजी दिसून येत असून यापैकी जतचे माजी आमदार विलासराव जगताप, खानापूरचे अनिल बाबर यांनी तर उघड विद्यमान खासदारांच्या विरोधात भूमिका वेळोवेळी मांडली आहे, सांगली, मिरजेतील आमदारासोबत फारसे सख्यही नाही, शत्रूत्वही नाही अशी स्थिती आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो. दुसर्‍या बाजूला माजी आमदार देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष असताना पक्ष विस्ताराबरोबरच पक्ष बांधणीसाठीही प्रयत्न केले असून त्या माध्यमातून त्यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. उमेदवारीची पक्षाअंतर्गत लढाईचा तिढा पक्ष कसा सोडविणार हाही भाजपच्यादृष्टीने महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.

गतवेळी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनाच महाविकास आघाडीकडून उमदेवारी मिळणार असे मानले जात असून तशी घोषणाही काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी केली आहे. आघाडीकडून अन्य कोणी फारसे इच्छुक नसले तरी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चर्चेसाठी उमेदवारीची मागणी पुढे करण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार असली तरी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार पाटील यांच्या गटालाही गळती लागली असून आमदार पाटलांचे अनेक मातब्बर शिलेदार अजितदादांच्या गटात जाण्याच्या तयारीत आहेत. याचा फायदा भाजपला होणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबर हे भाजपची उमेदवारी कोणाला मिळते यावरच आपली भूमिका निश्‍चित करतील. कारण त्यांचे आणि विद्यमान खासदार पाटील यांचे राजकीय मतभेद जगजाहीर आहेत. कोणत्याही स्थितीत ते पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा अथवा मदत देण्यास राजी होतील अशी स्थिती नाही. अजितदादा यांच्या रुपाने भाजपला बेरीज होत असली तरी स्थानिक पातळीवरील मतभेदांची दरी रुंदावणार नाही याचीही खबरदारी घ्यायला लागणार आहे.

हेही वाचा – जमिनीच्या माध्यमातून रायगडकरांशी जवळीक साधण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न

भाजपमध्ये उमेदवारीसाठी विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. यामुळे कोणा एकाला उमेदवारी दिली तर दुसरा नाराज होऊन या नाराजीचा फटका पक्षाला बसण्याचा धोका लक्षात घेऊन भाजपकडून अखेरच्या क्षणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आणले जाऊ शकते.

यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही मैदानात उतरण्याची तयारी केली असून त्यानी वंचित बहुजन आघाडीशी संवाद साधला आहे. वंचित आघाडीनेही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला असून हा मतांचा गठ्ठा काँग्रेसपासून रोखण्याचे काम या माध्यमातून केले जाते आहे का अशीही शंका व्यक्त केली जात आहे. गतवेळेप्रमाणेच यावेळीही सध्या तरी तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

२०१९ मध्ये उमेदवारांना मिळालेली मते :

संजयकाका पाटील (भाजप)- ५,०८,९९५

विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना) ३ , ४४,६४३

गोपीचंद पडळकर, बहुजन वंचित आघाडी- ३,००,२३४

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli the advantage of the three way contest is again bjp faction within bjp itself against mp sanjaykaka patil print politics news ssb