संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर न चुकता काही व्हिडीओ पोस्ट केले जातात. या व्हिडीओमध्ये विरोधी पक्षातील काही वरिष्ठ नेते काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अवतीभोवती जमा झालेले दिसतात. सभागृहात सरकारची कोंडी करण्यासाठी काय रणनीती आखावी यासंबंधी त्यांच्यात खल सुरू असतो. विरोधकांची एकजूट दाखवणे, हा यामागचा प्रमुख उद्देश असतो. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांच्या मागे केंद्रीय यंत्रणांनी भ्रष्टाचाराच्या चौकशांचा ससेमिरा लावला आहे. सीबीआय, ईडी अशा संस्थांकडून विविध राज्यांमध्ये कारवाई सुरू आहे. त्यामुळे ही एकजूट दिसत असल्याचे बोलले जाते.

विरोधक या माध्यमातून आमची एकजूट असल्याचे चित्र उभे करत असतील तरी त्यात फारसे तथ्य नाही. उदाहरणार्थ, काँग्रेसनंतर संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनातील बैठकांना सातत्याने अनुपस्थिती दर्शविली आहे. तृणमूल काँग्रेसने याआधी अदाणी समूहाच्या विरोधातदेखील काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. संसदेच्या संयुक्त समतीद्वारे (JPC) या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी काँग्रेसची मागणी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास झाला पाहिजे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने केली होती.

याआधीही, अदाणी प्रकरणाची चौकशी ईडीद्वारे व्हावी, यासाठी विरोधकांनी ईडीच्या संचालकांना विरोधकांच्या सहीचे संयुक्त पत्र दिले होते. या पत्रावरदेखील तृणमूल काँग्रेस (TMC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने स्वाक्षरी केली नव्हती. याबद्दल बोलताना टीएमसीचा नेता म्हणाला, या पत्रासाठी खरगे यांचे लेटरहेड नको होते. दोन्ही पक्षांमध्ये २०२१ पासून एक दरी निर्माण झाल्याचे यावरून दिसते. ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदा यूपीएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

टीएमसीचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांनी गुरुवारी (दि. १६ मार्च) सांगितले होते की, काँग्रेस पक्षाने काहीतरी एक ठरविले पाहिजे. तुम्हाला त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सोबत चालते. मेघालय विधानसभेच्या निवडणूक प्रचारात तुम्ही टीएमसीवर खालच्या पातळीची टीका केली. त्यामुळे टीएमसीने आपली वेगळी भूमिका घेतलेली असून आम्ही त्यावर ठाम आहोत.

रविवारी (१९ मार्च) रोजी ममता बॅनर्जी यांनी पक्षांतर्गत बैठकीत बोलताना सांगितले की, “राहुल गांधी भाजपाचे सर्वात मोठे… तुम्हाला सर्वांना माहिती आहेच, हे मी पुन्हा सांगू इच्छित नाही. त्यामुळेच भाजपा ते विरोधकांच्या छावणीचे नायक असल्याचे भासवत असते.” गेल्या काही दिवसांपासून भाजपाने विविध आघाड्यांवर राहुल गांधी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या आधारावर ममता बॅनर्जी यांनी वरील वक्तव्य केले.

परंतु असे असतानाही, ममता बॅनर्जी यांनी २०१९ साली विरोधकांना एकत्र आणण्यासाठी अनेक बैठका घेतल्या होत्या. जाहीर सभा घेतल्या होत्या. एवढेच नाही तर २०२१ साली पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतरही त्यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेस काहीतरी पुढाकार घेईल, याची प्रतीक्षाही बॅनर्जी यांनी पाहिली. तसेच काँग्रेस पक्षाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष रंजन चौधरी हे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यावर रोज उठून कसे काय टीका करतात? त्या काही काल उगवलेल्या नेत्या नाहीत, असा प्रश्न टीएमसीच्या एका नेत्याने उपस्थित केला.

खरगे यांच्या दालनातील बैठकांना सपा, आप आणि भारत राष्ट्र समितीचे खासदार उपस्थित असतात, याचा अर्थ विरोधकांमध्ये एकजूट आहे, असा होत नाही. आपच्या खासदारांनी सांगितले, “आम्ही याआधीच जाहीर केले आहे की, आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणूक लढविणार आहोत. आमचे नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रत्येक भाषणात सांगत असतात. मात्र ज्या राज्यात प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व आहे, त्या राज्यात आम्ही निवडणूक लढविणार नाही.”

Story img Loader