काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू हे सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. कधी आक्रमक बोलणे तर कधी भडक कृती सिद्धू यांच्या अडचणीत भर टाकत असते. आता एका जुन्या प्रकरणामुळे सिद्धू पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. ‘रोड रेज’ प्रकरणात सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ‘रेड रेज’ प्रकरणात निकाल दिला त्या दिवशी एका आक्रमक क्रिकेटपटूचे आता राजकारणी झालेले सिद्धू पतियाळा येथे महागाई विरोधातील आंदोलनात हत्तीवर स्वार झाले होते.
आक्रमक क्रिकेटपटू ते राजकीय नेता
एक भडक क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक ते कॉमेडी शोचे परीक्षक आणि शेवटी राजकारणी असा नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रवास आहे. आक्रमक आणि भडक बोलणे, नाटकी वागणे या गोष्टी नेहमीच सिद्धू यांच्या वागण्यातून दिसून येतात. सिद्धू हे राजकारणात येण्यापूर्वी एक प्रसिद्ध ‘शो स्टॉपर’ होते. त्यांनी २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. २०१६ ला त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमृतसर पूर्व विधानसभा मतदार संघातून सिद्धू यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र या पराभवानंतर सिद्धू राजकीय संन्यास घेतील असे अनेकांना वाटले होते. पण झाले नेमके याच्या उलट. सुप्रीम कोर्टाच्या धावपळीत सिद्धू यांनी दोन महिने घालवले. या काळात त्यांनी काँग्रेस आणि सत्ताधारी पक्ष असलेला ‘आप’ यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.
बंडखोर स्वभाव
२०२१ मध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी कॅप्टन यांचे उत्तराधिकारी असणाऱ्या चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मोर्चा वळवला. पक्षाने वरिष्ठ पद नाकारल्यामुळे होणारा त्रागा त्यावेळी त्यांच्या वागण्यातून दिसत होता. मुख्यमंत्री पद मिळणार नाही हे वास्तव स्वीकारण्यास ते तयार नव्हते.
गेल्या दोन महिन्यांमध्ये सिद्धू यांनी भेटीगाठी घेण्याचा धडाकाच लावला होता. त्यांनी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेऊन त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली. ती ऑफर त्यांनी नाकारली. ही भेट म्हणजे दोन जुन्या मित्रांची भेट असल्याचे सिद्धू यांनी सांगितले. या महिन्याच्या सुरवातीला पक्षाचे प्रभारी हरीश चौधरी यांचे एक पत्र लीक झाल्यामुळे सिद्धू यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार होती. मात्र अजूनपर्यंत त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. सुनील कुमार जाखड हे नुकतेच भाजपामध्ये सामील झाले आहेत. त्यांना काँग्रेस सोडू देऊ नका, त्यांची समजूत काढा, अशी विनंतीही सिद्धू यांनी पक्षाला केली होती.
सिद्धू यांनी भगवंत मान यांना आपला धाकटा भाऊ म्हणत सत्ताधारी पक्षाला गुगली टाकली. ९ मे रोजी त्यांनी भगवंत मान यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर “रचनात्मक ५० मिनिटे” असे त्या भेटीचे वर्णन सिद्धू यांनी केले होते.
दरम्यानच्या काळात सिद्धू महागाई, महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी, घोटाळे याबत रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हासुद्धा ते महागाईविरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. मी यापुढे पंजाबच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरवलेले वैभव परत मिळवणे हे माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय असल्याचे सिद्धू म्हणाले.
त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सिद्धू यांनी मात्र “कायद्याच्या कक्षेच्या अधीन राहीन” असे ट्वीट केले आहे.