कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तिकीट डावलल्यामुळे अनेक वरिष्ठ भाजपा नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता मध्य प्रदेशमध्येही भाजपाचे मोठे नेते पक्ष सोडून काँग्रेसमध्ये दाखल होताना दिसत आहेत. मध्य प्रदेशमध्ये काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच भाजपाचे माजी राज्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे सुपुत्र दीपक जोशी यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी विलंब केल्यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत वाद उत्पन्न झाल्यानंतर दीपक जोशी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्मारकासाठी तातडीने जमीन दिली होती, असा उल्लेखही त्यांनी केला. “काँग्रेसने माझ्या वडिलांचा सन्मान राखला. मात्र भाजपाने तसे केले नाही. उलट भाजपाने त्यांचा अवमानच केला. माझ्या वडिलांच्या अवमानाचा सूड घेण्यासाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. मी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी सांगितले. पण स्मारकाचे काम करण्याऐवजी त्यांनी १०० कोटी रुपये खर्च करून भाजपाचे कार्यालय बांधायला घेतले आहे, “अशी प्रतिक्रिया जोशी यांनी माध्यमांना दिली.
दीपक जोशी यांचे पक्षात स्वागत करीत असताना कमलनाथ म्हणाले की, आजचा दिवस हा फक्त काँग्रेससाठीच नाही तर संपूर्ण राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. दीपक जोशी यांनी सत्याचा आधार घेतला. लोकशाहीचे संरक्षण करण्याच्या लढाईत आणि मध्य प्रदेशचे ‘जंगल राज’ संपविण्यासाठी जोशी यांचे स्वागत करतो.
दरम्यान, भाजपाने मात्र दीपक जोशी यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. कैलाश जोशी हे कधीही काँग्रेसमध्ये सामील झाले नसते. काँग्रेस आणि त्यांच्यात कोणतेही साम्य नव्हते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हितेश बाजपेयी यांनी सांगितले, “कैलाश जोशी भाजपा कार्यकर्त्यांच्या हृदयात वसलेले आहेत. आम्ही त्यांचा विचार पुढे घेऊन जाऊ. तुम्ही (दीपक जोशी) काँग्रेसमध्ये सामील होताना हातात कैलाश जोशी यांची प्रतिमा धरली होती. प्रतिमा घेऊन काँग्रेसमध्ये गेलात, याचा अर्थ कैलाशजी तिकडे गेले असा होत नाही. कैलाश जोशी आमचे संस्थापक आहेत. दीपक जोशी यांनी आमच्यासोबत एवढा काळ घालविल्यानंतर ते भाजपामध्ये गेले, हे खेदजनक आहे.”
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रजनीश अग्रवाल म्हणाले की, दीपक हे कैलाश जोशी यांचे रक्ताचे वारसदार असतील, पण प्रदेश भाजपा हा त्यांचा वैचारिक वारसदार आहे. दीपक जोशी यांनी मात्र भाजपा सोडण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना जबाबदार ठरवले आहे. माझ्या पत्नीला करोना काळात वेळेवर रुग्णवाहिका न मिळू शकल्यामुळे तिचा मृत्यू झाला. शिवराजसिंह चौहान यांच्या कुचकामी प्रशासनामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप दीपक जोशी यांनी केला आहे.
प्रदेश काँग्रेसने दीपक जोशी यांचे स्वागत केले. कैलाश जोशी हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, सात वेळा आमदार होते. राज्यात त्यांची प्रतिमा ‘संत’ राजकीय पुढारी अशी होती. काँग्रेसला कैलाश जोशी यांचे समर्थक आणि दीपक जोशी यांचे नेतृत्व याचा राजकीय वापर करण्याची संधी चालून आली आहे. दीपक जोशी हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांचाही पक्षाला लाभ होईल, अशी अटकळ काँग्रेसकडून बांधली जात आहे.
दीपक जोशी यांनी २००० सालानंतर राजकारणात प्रवेश केला होता. २००३ च्या निवडणुकीत देवास जिल्ह्यातील बागली मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांचा कौटुंबिक मतदारसंघ हातपिपलिया येथून २००८ आणि २०१३ रोजी त्यांनी विजय मिळवला. सलग तीन वेळा विजय प्राप्त केल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. २०१८ पर्यंत ते मंत्रीपदावर कायम होते. २०१८ साली काँग्रेसचे उमेदवार मनोज चौधरी यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. विजय मिळविल्यानंतर मनोज चौधरी यांनी २०२० साली भाजपात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा पोटनिवडणुकीत हातपिपलिया मधून विजय मिळवला.
ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासोबत चौधरी यांनी भाजपामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. सिंदिया यांच्यासोबत काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे तत्कालीन कमलनाथ सरकार पडले होते.