सोलापूर : भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते या दोन्ही आमदारांमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत मिळत असताना या लढतीत वंचित बहुजन आघाडीसह एमआयएम आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या तिन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी वांचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही उमेदवारी रिंगणात होती. आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाच्या मदतीने एक लाख ७० हजार मते घेतली होती. तर सुशीलकुमार शिंदे यांना भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींकडून (पाच लाख २४ हजार ९८५ मते) एक लाख ५८ हजार ६०८ मतफरकाने पराभव पत्करावा लागला होता. अर्थात या मोठ्या मतविभागणीमुळे शिंदे यांना खासदारकीपासून ‘ वंचित’ राहावे लागले होते. हा अनुभव पाठीशी असताना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतांची विभागणी होणे काँग्रेसला अजिबात अपेक्षित नाही. त्यासाठी काँग्रेसच्या मंडळींनी देव पाण्यात ठेवले आहेत.
हेही वाचा : विदर्भातील पाच जागांवर भाजपपुढे थेट लढतीचे आव्हान
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीसह एमआयएम आणि नव्यानेच अस्तित्वात आलेल्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हे तिन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार का, याबाबतचे चित्र अद्यापि समोर आले नाही. वंचितच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी सोलापूरच्या जागेवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय प्रलंबित असल्याचे सांगताना लवकरच भूमिका ठरणार असल्याचे स्पष्ट केले. तर एमआयएम पक्षात उमेदवार उभे करण्याची मानसिकता तयार झाली नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी मतविभागणी टाळावी. त्यादृष्टीने उमेदवार उभा करू नये. आगामी सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी या पक्षाचे नेते रियाज खरादी यांनी केली आहे. मात्र पक्षाची भूमिका अद्यापि अनिश्चित आहे.
हेही वाचा : मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू
तेलंगणातील बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी मुख्यमंत्री असताना सोलापुरात पक्षाची बांधणी सुरू केली होती. पंढरपूरच्या आषाढी यात्रेचे औचित्य साधून आणि पक्षाच्या विस्तारावर डोळा ठेवून केसीआर हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपुरात आले होते. त्यातून सोलापूर शहर व जिल्ह्यात पक्ष बांधणी सुरू झाली होती. आता तेलंगणात केसीआर यांनी सत्ता गमावल्यानंतर इकडे महाराष्ट्राप्रमाणे सोलापुरातही बीआरएसचा रथ जागेवरच रुतून बसला आहे. पक्षासमोर एकही कार्यक्रम दिसत नाही. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत हा पक्ष उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्षाचे जिल्हा संघटक दशरथ गोप यांनी लोकसभा लढतीबाबत पक्षश्रेष्ठींकडून आदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगितले.