आठवडाभरानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत ‘मोदी की गॅरंटी’ या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या घोषणेचा दहा पेक्षा अधिक वेळा उल्लेख करीत मतदारांना आपल्याला पुन्हा निवडून देण्याची भावनिक साद घातली. एक प्रकारे मोदी यांनी निवडणूक प्रचाराचे रणशिंगच सोलापूरमध्ये फुंकले. तसेच सोलापूरमधील लक्षणिय मतदार असलेल्या पद्मशाली आणि विश्वकर्मा या दोन समाजांचा जाणीवपूर्वक उल्लेख करीत या मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभेच्या जागा सध्या भाजपकडे आहेत. याशिवाय आसपासच्या लातूर, धाराशिव या मतदारसंघांवर प्रभाव पाडण्यासाठी मोदी यांच्या सभेचा वापर भाजपने पद्धतशीरपणे करून घेतला. घरांच्या लोकार्पणानंतर मोदी यांनी सोलापूरकरांना साद घातली. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोदी यांनी प्रत्येक सभेत ‘मोदी की गॅरंटी’चा सतत उल्लेख केला होता. या तिन्ही राज्यांमधील भाजपच्या विजयात मोदी यांच्या ‘मोदी की गॅरंटी’चा विशेष उपयोग झाल्याचे भाजपचे निरीक्षण आहे. तेव्हापासून ‘मोदी की गॅरंटी’ ही घोषणा भाजपकडून पद्धतशीरपणे लोकप्रिय करण्यात येत आहे.

हेही वाचा : आत्रामांच्या दाव्यामुळे महायुतीत धूसफूस, भाजपमध्येही दुफळी ! महाविकासआघाडीचा उमेदवार जवळपास निश्चित

सोलापूरमधील सभेत गरिबांची धरे, गरिबी हटविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपायांची माहिती देतानाच मोदी यांनी मुद्दामहून ‘मोदी की गॅरंटी’चा सतत उल्लेख केला. गेली दहा वर्षे गोरगरीबांचा आमच्या सरकारने सेवा केली. त्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पुढील पाच वर्षे गरिबांना मोफत धान्य देण्याची ग्वाही सरकारने दिली आहे. गरीब, शेतकरी, कामगार, दुर्बल घटकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. आमच्या सरकारवर पुन्हा विश्वास दाखवावा, असे आवाहन करीत मोदी यांनी आगामी निवडणुकीत भाजपला मतदान करावे, असेच लोकांना सूचित केले. यासाठी ‘मोदी की गॅरंटी’चा उल्लेख करीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

सोलापूरमध्ये पद्मशाली आणि विश्वकर्मा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन्ही समाजांचा गौरव करीत त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सोलापूर आणि अहमदाबादचे कसे भावनिक नाते याचा दाखला दिला. सोलापूरच्या प्रसिद्ध चादरीची आठवण करून दिली.

हेही वाचा : हरियाणात ‘आप’ला मोठा धक्का, महत्त्वाच्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी; लवकरच भाजपात प्रवेश करणार!

गेल्या आठवड्यात नाशिकमधील युवा महोत्सवात मोदी यांनी घराणेशाहीवर हल्ला चढविला होता. मुंबईतील सभेत पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारच्या योगदानावर भर दिला होता. सोलापूरच्या सभेत मोदी यांनी ‘मोदी की गॅरंटी’ याला प्राधान्य देत मोदींकडे बघून पुन्हा मते द्या, असेच लोकांना आवाहन केले. लागोपाठच्या दोन दौऱ्यांच्या माध्यमातून मुंबई व महानगराच पट्टा, नाशिक व उत्तर महाराष्ट्र आणि आता सोलापूरमध्ये सभा घेऊन आसपासच्या परिसरात वातावरणनिर्मिती करण्याचा मोदी यांनी प्रयत्न केला आहे.

आगामी लोकसबा निवडणुकीत भाजपची सारी मदार ही उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश अशा मोठ्या राज्यांवर आहे. यामुळेच राज्यात जास्तीत जास्त दौरे करून मोदी मतदारांना भावनिक साद घालीत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतीस सागरी मार्ग व अन्य प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मोदी पुन्हा राज्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur prime minister narendra modi s emotional appeal to voters with modi ki guarantee slogan print politics news css
Show comments