मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे घालण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी बरीच रीघ लागली होती. कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानाची पत्नी व मुलगा परभणी येथून नोकरीच्या कामासाठी आला होता. तर आळंदी येथील डॉ. गणपतराव जगताप महाराज हे अंध असूनही मदतनीसाच्या मदतीने भरमसाठ आलेले वीजबिल कमी करण्यासाठी आणि बंद पडलेले मीटर बदलून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज घेवून आले होते. बदल्या, नियुक्त्या, निविदा आणि बिले अदा करणे, ही कामे केली जाणार नाहीत, असे फलक मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर लावण्यात आले असून तरीही शेकडो नागरिकांची मंगळवारी रीघ लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारने ६०० हून अधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने दखल घेवून निर्णय घ्यावेत, त्यांना मंत्रालयात हेलपाटे घालावे लागू नयेत, अशा सूचना अनेकदा देण्यात आल्या आहेत. तरीही मंत्रालयात आणि विशेषत: मुख्यमंत्री कार्यालयात गाऱ्हाणे घेवून येणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी ही संख्या मोठी असून फडणवीस हे मंगळवारी सायंकाळपर्यंत मंत्रालयात उपस्थित असल्याने त्यांच्या भेटीसाठी शेकडो नागरिक धडपड करीत होते. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयात दुपारनंतर पाऊल ठेवायला जागा नव्हती. मंत्रालयात प्रवेशासाठी ‘ फेस स्कॅनिंग ’ प्रणाली सुरु केल्यानंतरही मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर कोणताही परिणाम झाला नसून त्यांना प्रवेश पास मिळाले होते.

परभणी येथील महिलेच्या पतीचे कारगील युद्धात निधन झाल्यानंतर तिला अनुकंपा तत्वावर नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. पण मुले लहान असल्याने तिने शासकीय नोकरी घेतली नाही. पण गेली अनेक वर्षे ती जिल्हाधिकारी, मंत्रालय व मुख्यमंत्री कार्यालयात मुलाच्या अनुकंपा नोकरीसाठी हेलपाटे मारत आहे. देवाची आळंदी येथील जगताप महाराजांचा तेथे आश्रम असून त्यांच्याकडे महावितरणचे वीजेचे चार मीटर आहेत. त्यापैकी एका मीटरचे बिल व्याज व थकबाकीसह २६ हजार रुपये आले असून अन्य मीटरची बिले दोन-अडीच हजार रुपये येत असताना बंद असलेल्या मीटरचे जादा बिल आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. बंद मीटर बदलून देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. दहिसर येथे शासकीय जागेत गेली ४० वर्षे असलेला स्टॉल पाडला गेला. त्याबदल्यात तिला गाळा देण्यात आला. त्यापोटी तिला काही रक्कम भरण्यास सांगितली. पण ती कमी करण्याची तिची मागणी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यासाठी ही महिला आली होती. पण तिने मुख्यमंत्री कार्यालयात जोरजोरात आरडाओरडा केल्याने महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार घेवून येणाऱ्या नागरिकांची रीघ मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.