गणेश नाईकांच्या खेळीने दोन्ही शिवसेनेची कोंडी

ऐरोलीमधून भाजपची उमेदवारी घेणाऱ्या गणेश नाईकांनी बेलापूर मतदारसंघातील मुलाच्या बंडाविषयी सावध भूमिका मांडली आहे.

belapur vidhan sabha
गणेश नाईकांच्या खेळीने दोन्ही शिवसेनेची कोंडी (संग्रहित छायाचित्र)

ठाणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप यांनी मंगळवारी बेलापूर मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी चिन्ह हाती घेतल्याने शहरात निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही शिवसेनेची कोंडी झाली आहे.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ऐरोली ही शिवसेना (ठाकरे) यांना तर बेलापूर राष्ट्रवादीला ( शरद पवार) सोडली जाईल हे स्पष्ट होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत कोपरखैरणे पासून दिघ्यापर्यत पसरलेल्या ऐरोलीत मोठया नाईकांना पाडण्यासाठी कष्ट घेणाऱ्या ठाकरे यांच्या शिवसैनिकांला वाशी ते बेलापूर पट्टयात मात्र नाईक पुत्राला निवडून आणण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे. शिंदे यांच्या शिवसैनिकांना ऐरोलीत नाईक यांच्यामुळे ‘कमळ’ नकोय तर बेलापूरमध्ये मात्र नाईकांविरोधात ‘कमळ’ फुलविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यामुळे दोन्ही शिवसेनेचे नेते सध्या गांगरुन गेले आहेत.

हेही वाचा : वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा कायम; उमेदवार जाहीर करून भाजपची प्रचारात आघाडी

नवी मुंबई शहरात गणेश नाईक यांचे राजकीय वर्चस्व नेहमीच दिसून आले आहे. दहा वर्षांपुर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हवेत मंदा म्हात्रे यांनी बेलापूरमधून मोठया नाईकांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मात्र नाईकांनी स्वत:ची सत्ता आणली. गणेश नाईक यांचे धाकटे पुत्र संदीप हे ऐरोली विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहीले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत नाईक कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत गणेश नाईक यांनाच उमेदवारी मिळाली. यामुळे संदीप यांना माघार घ्यावी लागली. अडीच वर्षांपूर्वी राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतरही गणेश नाईक यांना मंत्री पद देण्यात आले नाही. यामुळे नाईक यांचे समर्थक अस्वस्थ होते. यंदाच्या निवडणुकीत गणेश नाईक आणि संदीप नाईक या दोघांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत ऐरोलीतील गणेश नाईक आणि बेलापूर मधून मंदा म्हात्रे यांची नावे जाहीर करण्यात आली. संदीप नाईक यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे बंडाची भूमीका घेणाऱ्या संदीप यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा : मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना

दोन्ही शिवसेनेची परीक्षा

ऐरोलीमधून भाजपची उमेदवारी घेणाऱ्या गणेश नाईकांनी बेलापूर मतदारसंघातील मुलाच्या बंडाविषयी सावध भूमिका मांडली आहे. ‘संदीप यांचा निर्णय पुर्णपणे व्यक्तीगत आहे’ असे नाईक यापुर्वीच म्हणाले आहेत. थोरले नाईक असे जरी म्हणत असले तरी मोठया नाईकांच्या बेलापूरमधील सर्व समर्थकांनी मंगळवारी भाजपला रामराम ठोकला. संदीप यांना बेलापूरमधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल हे स्पष्ट होऊ लागताच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसैनिक मात्र संभ्रमात पडले आहेत. ऐरोलीत मोठया नाईकांविरोधात ठाकरे उमेदवाराच्या शोधात आहेत. ही जागा ‘मशाली’साठी सोडली जाईल हे जवळपास स्पष्ट आहे. असे असल्याने ऐरोलीत नाईकांविरोधात प्रचार करायचा आणि बेलापूरात मात्र संदीप यांच्या विजयासाठी दारोदार भटकायचे अशी वेळ उद्धव सेनेच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांना नवी मुंबईत नाईक या नावाचीच एलर्जी आहे. त्यामुळे ऐरोलीत गणेश नाईकांचे कमळ नको अशी भूमीका हे नेते जाहीरपणे घेताना दिसत आहेत. बेलापूरमध्ये मात्र नाईकांचा मुलगा नको यासाठी ‘कमळा’साठी शिंदेसेनेत कधी नव्हे इतके एकत्रिकरण आतापासूनच दिसू लागले आहे. दोन नाईकांच्या वेगवेगळ्या भूमीकांमुळे दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची होणारी ही दमछाक चर्चेचा विषय ठरु लागली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In thane belapur vidhan sabha constituency sandeep naik joined ncp sharad pawar faction print politics news css

First published on: 22-10-2024 at 16:36 IST
Show comments