भगवान मंडलिक
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात मोठी ताकद उभी करणाऱ्या भाजपमध्ये सध्या केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील जाहीर वादामुळे दुहीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. भाजपचे ग्रामीण भागाचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांची कार्यपद्धती हे सध्या या दोन नेत्यांच्या वादाचे कारण ठरु लागले असून पाटील यांचे समर्थन लाभलेल्या मोहपे यांना हटवावे यासाठी कथोरे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु केल्याने एरवी सुरक्षीत वाटणारा भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपासाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भिवंडी लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणारे पाटील यांच्यासाठी पाच वर्षापुर्वी झालेली निवडणुक सोपी नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पाटील दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले. २०१४ च्या तुलनेत मताधिक्य वाढले या खुशीत पाटील असले तरी हा विजय त्यांच्यासाठी वाटतो तितका सोपा नव्हता. मोदी लाटेवर स्वार होत सलग दोन वेळा लोकसभेत पोहचलेल्या पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत मात्र विरोधकांपेक्षा घरच्या आघाडीवरच विरोधाचा सामना करावा लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे ग्रामीणचे भाजप अध्यक्ष मधुकर मोहपे यांच्या कार्यपद्धतीवरुन सध्या पाटील आणि कथोरे यांच्यात जाहीर वाद सुरु असून मोहपे यांना हटवा या मागणीसाठी कथोरे समर्थकांनी थेट प्रदेशाध्यक्षांचे दरवाजे थोटविल्याने ग्रामीणच्या गडातील विसंवादाचे हे वारे भाजपसाठी धोक्याची घंटा ठरु लागले आहेत.
हेही वाचा >>>भाजपा नेत्याच्या निवासस्थानीच मुलाच्या मित्राची हत्या; केंद्रात मंत्री असलेले कौशल किशोर कोण आहेत?
बेरजेच्या भिवंडीत भाजपचे उणे राजकारण
राज्यात लोकसभेच्या अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी भाजपची बेरजेची गणिते विविध पातळ्यांवर सुरू आहेत. एकेकाळी कॅाग्रेसचा बालेकिल्ला असणारा या मतदारसंघातील काही विधानसभा क्षेत्रातही भाजपने बस्तान बसविले आहे. त्यामुळे प्रतिकूल वातावरणातही मोदी लाटेत कपील पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ बेरजेचा ठरु लागला आहे. असे असताना मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना सातत्याने नाराज करत पाटील यांनी येथे वजाबाकीचे राजकारण सुरु केल्याच्या तक्रारी कथोरे समर्थकांनी श्रेष्ठींकडे केल्या आहेत. मंत्री पाटील यांच्या आक्रमक राजकारणामुले भाजपच्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय, प्रशासकीय अनुभवाने मंत्री कपील पाटील यांच्या पेक्षा ज्येष्ठ असलेले मुरबाड मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सध्या मंत्री पाटील सोडत नाहीत. यात कथोरेंसह समर्थकांची कोंडी झाली आहे.
हेही वाचा >>>‘केसीआर यांची उलटी गिनती सुरू’, महाराष्ट्रावर लक्ष ठेवणाऱ्या केसीआर यांच्या तेलंगणात काँग्रेसची मोठी खेळी
कथोरे विरोधासाठी मोहपे
ग्रामपंचायतीपासून प्रवास सुरू केलेले कथोरे वय, राजकीय अनुभवाने कपील पाटील यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. दोघांचे राजकीय मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे. पाटील आगरी समाजातील तर कथोरे कुणबी समाजाचे. मुरबाड, शहापूर, भिवंडी ग्रामीण, कथोरे यांचे यापूर्वीचे बलस्थान असलेला अंबरनाथ परिसर बहुतांशी कुणबी समाजाचे वर्चस्व असलेला आहे. राज्यात सरकार कोणाचेही असो शासनाकडून विकास कामे आणण्यात कथोरे यांचा हातखंडा राहीला आहे. आमदार कथोरे यांच्या मुरबाड मतदारसंघात पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. असे असताना पक्षात यापूर्वी फार सक्रिय नसलेले, एकेकाळचे कथोरे यांचे कट्टर समर्थक मधुकर मोहपे यांना कपील पाटील यांनी जवळ करुन कथोरे यांना मोहपेंच्या माध्यमातून उघडपणे शह देण्यास सुरवात केली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये कथोरे यांनी सिनेट सदस्य रवींद्र घोडविंदे यांना बळ देण्यास सुरुवात केली. या कृतीने दुखावलेले मोहपे कथोरे यांच्यापासून दूर झाले. पाटील यांनी मोहपे यांना भिवंडी लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष पद देऊ केले. त्यामुळे पाटील आणि कथोरे यांच्यातील विसंवाद आणखी वाढला आहे. ग्रामीण मध्ये भाजपच्या फलकांवर कथोरे यांची छबी, नाव नसल्याची खबरदारी मोहपे यांच्याकडून घेतली जात आहे. भाजप व्हाॅट्पस गटातून कथोरे समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. आतापर्यंत आभासी पध्दतीने सुरू असलेली ग्रामीण भाजपमधील ही नुराकुस्ती आता हातघाईवर आली आहे. या कृतीने दुखावलेले कथोरे समर्थकानी थेट प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
“भाजपच्या जुन्या व्हाॅट्सप गटामध्ये नीलेश सांबरे यांचे कार्यकर्ते समाविष्ट आहेत. भाजपच्या अंतर्गत हालचाली त्यांना गटातील चर्चेतून समजतात. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. कथोरे समर्थकांना गटातून बाहेर काढले जात नाही.”- मधुकर मोहपे, भाजप अध्यक्ष,ठाणे जिल्हा ग्रामीण.