ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा ठरलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा करत भाजपने शिंदे सेनेची मोठी कोंडी केल्याचे चित्र पुढे येत असले तरी या विचीत्र राजकीय तिढ्यामुळे नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांची अवस्थाही इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. हा मतदारसंघ भाजपला सुटला नाही तर नाईकांचे थोरले पुत्र संजीव यांना शिंदे सेनेने आयात करावे असा प्रस्तावही महायुतीच्या चर्चेत पुढे आला असल्याचे वृत्त आहे. काहीही झाले तरी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपचा ‘चेहरा’ बिंबविण्याचे जोरदार प्रयत्न भाजपकडून असले तरी नवी मुंबईतील राजकीय गणिते पहाता नाईकांना मात्र ‘धनुष्यबाण’ पेलवेल का असा प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चिला जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील राजकीय पटलावर एकेकाळी निर्वीवाद सत्ताधीश म्हणून गणेश नाईक यांचा एकेकाळी वावर राहीला आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे अलिकडच्या काळात नवी मुंबईतील घरच्या मैदानातच नाईकांना सध्या संघर्षमय परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील राजकारण कोणत्याही दिशेने चालो नवी मुंबईतील सत्ता ही नाईक कुटुंबियांसाठी नेहमीच प्राधान्यक्रम ठरली आहे. २०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही गणेश नाईक यांनी येथील येथील महापालिकेवर राष्ट्रवादी काॅग्रेसची सत्ता आणली होती. गेल्या दहा वर्षात मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांनी गणेश नाईकांना नवी मुंबईच्या आघाडीवर पुर्ण सुट दिली होती. भाजपमध्ये बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या रुपाने नाईकांना घरातच विरोधाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक तर नाईकांचे कट्टर विरोधक मानले जातात. येथील महापालिकेवर गेल्या चार वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. एकनाथ शिंदे म्हणतील तीच पुर्वदिशा असा या महापालिकेचा कारभार आहे. त्यामुळे आधीच याठिकाणी नाईकांची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षात असलेले ३८ माजी नगरसेवकांपैकी कुणीही उठतो आणि नाईकांना आव्हान देतो अशी येथील परिस्थिती आहे. असे असताना ठाण्याची खासदारकी मिळविण्यासाठी शिंदेचे धनुष्यबाण खांद्यावर घ्यावे तरी कसे या विवंचनेत सध्या थोरले नाईक पहायला मिळत आहेत.
हेही वाचा : नफ्यापेक्षा दुप्पट रोखे दान; आठ कंपन्यांचा प्रताप
शिंदेची दुहेरी कोंडी
राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर भाजपने ठाणे जिल्ह्यातील महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासनात गेल्या दोन वर्षात कोणतीही लुडबूड केलेली नाही. शिंदे पिता-पुत्रांना जिल्ह्यात मुक्तपणे वावरता येईल अशापद्धतीची ही रचना होती. यामुळे जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक शहरात भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालिची अस्वस्थता आहे. नवी मुंबईच्या कारभारावर ठाण्याच्या वाढत्या प्रभावामुळे नाईकही अनेकदा अस्वस्थ झालेले पहायला मिळाले आहेत. महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे संतापलेल्या नाईकांनी ‘नवी मुंबईचे कारभारी ठरविणारे तुम्ही कोण’ असा सवालच एका जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळून केला होता. असे असले तरी लोकसभेच्या जागा वाटपच्या निमीत्ताने भाजपने मुख्यमंत्र्यांची मोठी कोंडी केल्याचे पहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्याच्या आर्थिक, प्रशासकीय नाड्या तुमच्या हाती दिल्या आता ठाणे, कल्याण यापैकी एक जागा द्या अशी तिरकी खेळी भाजपकडून खेळली गेल्याचे एव्हाना शिंदे यांच्याही लक्षात आले आहे. विशेष म्हणजे ठाण्यावर दावा करताना भाजपकडून थेट नाईक कुटुंबियांपैकी एकाचे नाव पुढे करुन शिंदे यांची दुहेरी कोंडी केली गेली आहे. शिंदे आणि नाईक सध्या एकमेकांना कितीही हसतमुखाने भेटत असले तरी या दोघांमधील छुपा संघर्ष कधीही लपून राहीलेला नाही. अशा परिस्थितीत ठाणे भाजपला देणे आणि तेही नाईकांसाठी हे शिंदे यांच्यासाठी अवघड ठरणार आहे.
हेही वाचा : क्षत्रिय-दलित वादावरून गुजरातमध्ये भाजपा अडचणीत!
नाईक ‘कमळा’साठीच आग्रही
महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्र्यांनी ठाण्यासाठी कमालिचा आग्रह धरल्याने संजीव नाईक यांना धनुष्यबाणावर संधी द्या असा प्रस्ताव भाजपकडून आल्याची चर्चा आहे. हा प्रस्ताव खुद्द नाईकांना किती मान्य आहे याविषयी सध्या संभ्रम आहे. गणेश नाईक यांचा नवी मुंबईतील राजकीय संघर्ष हाच मुळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांशी आहे. महापालिका निवडणुकीत नवी मुंबईत धनुष्यबाण नको असा प्रचार नाईक यांना करावा लागणार आहे. अशा परिस्थीतीत लोकसभा धनुष्यबाणावर लढविणे योग्य नाही असा मतप्रवाह नाईक कुटुंबियांमध्ये असल्याचे सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाणावर मत मागायचे आणि महापालिका निवडणुकीत कमळासाठी आग्रह धरत धनुष्यबाण घेऊन लढणाऱ्या उमेदवारांना पाडण्यासाठी दंड, बैठका कशा मारायच्या असा प्रश्न आमच्यापुढे आहे , अशी प्रति क्रिया गणेश नाईक यांच्या निकटवर्तीय नेत्याने दिली. महापालिका निवडणुकीत नाईक युती करणार नाहीत ही आम्हाला खात्री आहे. त्यामुळे लोकसभेसाठी आम्ही त्यांचा प्रचार करणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे ठरेल, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थक नेत्याने व्यक्त केले.