ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतरही भाजप पक्षनेत्याकडून ठाणे लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घेतला जाईल या आशेवर असलेले या मतदारसंघाचे माजी खासदार आणि इच्छुक उमेदवार संजीव नाईक यांनी समाजमाध्यमे तसेच बैठकांच्या माध्यमातून आपला प्रचार सुरुच ठेवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होऊन चार दिवस उलटूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. हा मतदारसंघ शिंदेसेनेला मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात असली तरी नाईकांनी मात्र नवी मुंबईतील मोरबे धरण, कचराभूमी, रेल्वे विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचा : ऐन निवडणुकीत सेनापतींनीच सोडली साथ; दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा
नवी मुंबई महापालिकेचे पहिले महापौर म्हणून निवड झालेले संजीव नाईक २००९ ते २०१४ या कालावधीत ठाण्याचे खासदार राहीले आहेत. नवी मुंबईतील भाजपचे बडे नेते गणेश नाईक यांचा वारसा असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीच्या काळात त्यांचा प्रभाव होता. मात्र नरेंद्र मोदी यांच्या लाटेत त्यांचा मोठा पराभव झाला. २०१९ मध्ये ही लाट कायम असल्याचे लक्षात येताच त्यांनी निवडणूक लढविण्याचे टाळले आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला ऐनवेळेस आनंद परांजपे यांना ठाण्यातून रिंगणात उतरवावे लागले. यंदा मात्र संजीव नाईक भाजपकडून सुरुवातीपासून इच्छुक आहेत. असे असले तरी महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरु असल्याने ठाण्याचा तिढा कायम आहे. त्यामुळे संजीव नाईक यांचे लोकसभा निवडणुक लढविण्याचे भवितव्य देखील अधांरतीच आहे.
हेही वाचा : “काँग्रेसमध्ये नातेवाईकांना तिकीट, कार्यकर्त्याला किंमत नाही”; माजी मुख्यमंत्र्याची टीका
अजूनही आशा कायम, ब्रॅडीगही जोरात
ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल अशी चिन्हे दिसत असली तरी अजूनही या मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. एखादा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी सोडला जात असला तरी तेथील उमेदवार कोण असावा हे ठरविण्याच्या प्रक्रियेत भाजपचा शब्द महत्वाचा ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गोटातून पुढे आणण्यात आलेल्या नावांवर अजूनही भाजपकडून सहमतीची मोहर उमटविण्यात येत नसल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ अजूनही भाजपला मिळू शकतो या आशेवर असलेल्या संजीव नाईक यांनी मात्र स्वत:चा जोरदार प्रचार सुरु ठेवला आहे. संजीव यांनी वेगवेगळ्या समाजमाध्यमांद्वारे केलेल्या कामांची जोरदार प्रसिद्धी करण्यास सुरुवात केली असून नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाच्या हस्तांतरणात त्यांनी बजाविलेल्या भूमीकेची चित्रफीत तयार करण्यात आली आहे. याशिवाय नवी मुंबईतील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, येथील उद्याने, ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची खास चित्रफीत नाईक यांच्याकडून प्रसारित करण्यात आली आहे. खासदार असताना त्यांनी लोकसभेत केलेल्या भाषणांची प्रसिद्धीही समाजमाध्यमांद्वारे केली जात आहे. ठाण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असताना ऐनवेळी उमेदवारी जाहीर होऊन प्रचाराचा भार पडू नये यासाठी ही तयारी केली जात असल्याचे संजीव नाईक यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.