महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर दिमनी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले तर थेट मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होतील. पण, पराभूत झाले तर दिल्लीतूनच नव्हे तर चंबळ खोऱ्यातून गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवू शकते. दिमनीमध्ये बहुजन समाज पक्षाच्या ब्राह्मण उमेदवाराने लढत तिरंगी आणि चुरशीची केली असून मंत्रिमहोदयांना सर्व राजकीय कौशल्य पणाला लावले लागले आहे.

मध्य प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविरोधात मोदी-शहांनी दोन स्पर्धक उभे केले आहेत. तोमर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरेपर्यंत चंबळ-ग्वाल्हेर खोऱ्यातून ‘महाराजा’ ज्योतिरादित्य शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचे एकमेव दावेदार होते. पण, मोदी-शहांनी तोमर यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा अतितटीची करून टाकली आहे. इतकेच नव्हे तर एका दगडात तीन पक्षी मारले गेले आहेत. ‘तोमर जिंकले तर शिवराजसिंह यांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण होईल. तोमर हरले तर मध्य प्रदेशच्या राजकारणामध्ये आणि लोकसभा निवडणुकीतही नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल’, असे मुरैनातील भाजपच्या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.

हेही वाचा… राजस्थानच्या निवडणुकीत AIMIM ची उडी, तीन जागांसाठी उमेदवार जाहीर!

तोमर यांना ज्योतिरादित्य यांच्यासारखे राजघराणे लाभले नसले तरी राजकीय कारकीर्द सुरू होण्यामध्ये शिंदे घराण्याचा वाटा होता. अतिशय कष्टाने तोमरांनी चंबळच्या मुरैना जिल्ह्यामध्ये राजकारणावर जम बसवला. तोमर आत्तापर्यंत कधीही निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत. दिल्लीत ते मोदींच्या छत्रछायेखाली वावरत असले तरी, चंबळमध्ये त्यांनी राजकीय पकड सैल होणार नाही याची दक्षता घेतली आहे. गेल्या वर्षी ग्वाल्हेरच्या महापालिकेतील ५० वर्षांची सत्ता भाजपच्या हातून निसटली. या पराभवाशी कदाचित तोमर यांचा थेट संबंध नसेलही पण, वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या हे मात्र खरे! ‘भाजपने विधानसभा निवडणुकीत उतरवलेल्या केंद्रीयमंत्री आणि खासदारांना आपापल्या भागांतील तीन-तीन आमदार निवडून आणण्याची जबाबदारी दिली आहे. तोमर यांनाही मुरैनातील ६ पैकी किमान ३ जागा निवडून आणाव्या लागतील. तोमर दिमनीमध्ये गेलेले नाहीत. पण, त्यांना इतर मतदारसंघ पिंजून काढावा लागत आहे. यावेळी भाजपला मध्य प्रदेशात सुमारे ७० जागा मिळण्याची आशा होती. केंद्रीय मंत्र्यांमुळे भाजपच्या किमान २० जागा वाढू शकतील’, असे मुरैनाच्या कृषि बाजार समितीतील कर्मचारी किशोर घुरिया यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा… राजकीय कोंडीतून सुटकेसाठी नीलेश राणेंचा राजसंन्यास?

चंबळच्या खोऱ्यात चार-पाच नद्या वाहत असल्यामुळे पाण्याची कमतरता नाही. रस्ते सुस्थितीत आहेत. गावागावांमध्ये जाणे-येणे सोपे झाले आहे. इथे मोहरी, बाजरी आणि गहू अशी तीन पिके घेतली जातात. मुरैना जिल्ह्यातील दिमनी मतदारसंघ ग्वाल्हेरपासून तासाभराच्या अंतरावर आहे. ६४ योगिनी मंदिर याच मतदारसंघातील पडावली-मितावली गावांजवळ आहे. मध्य प्रदेशात अशी दोन मंदिरे आहेत, या मंदिरांच्या रचनेवर आधारित मूळ संसदभवनाची रचना केली आल्याचे सांगितले जाते. केंद्रीयमंत्री नरेंद्र तोमरांच्या विधानसभा मतदारसंघाचे हे वैशिष्ट्य आहे. इथले राजकीय गणित तोमरांना सोपे राहिलेले नाही. त्यामुळे इथे तोमरच जिंकतील याची गावकऱ्यांना खात्री नाही. तोमर हे केंद्रीयमंत्री असल्याने प्रशासनाची ‘मदत’ होईलच, असे काहींच्या बोलण्यातून सूचित होत असले तरी, हा आरोप अतिशयोक्ती ठरू शकेल.

हेही वाचा… मध्य प्रदेशमध्ये नेत्यांच्या राजीनामा अस्त्रामुळे भाजपा आणि काँग्रेस हैराण; तिकीट नाकारल्यामुळे नाराजी

दिमनी मतदारसंघातील जातींचे समीकरण तोमरांना जमवून आणावे लागेल. इथे दलित (जाटव) मतदार ४५ हजार, तोमर (ठाकूर) ६० हजार, ब्राह्ण ३५ हजार, गुर्जर-१८ हजार, कुशवाह-२० हजार, मुस्लिम मतदार १५ हजार आहेत. नरेंद्र तोमर यांच्या विरोधात काँग्रेसचे रवींद्रसिंह तोमर उभे आहेत. दोन्ही तोमर असल्यामुळे ठाकूर मते विभागली जाऊ शकतील. नरेंद्र तोमरांवर गुर्जरांचा राग आहे. मुस्लिम आणि जाटव मते रवींद्र तोमरांना जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बहुजन समाज पक्षाचे ब्राह्मण उमेदवार बलवीरसिंह दंडोतिया हेदेखील निवडून आले होते. दंडोतियांना ब्राह्मणांची मते मिळू शकतील. नरेंद्र तोमर यांचे एक विश्वासू कुशवाह असून त्यांच्या मर्जीवर तोमरांची कुशवाह मते अवबंलून आहेत, असे नगरा, काझी वसई वगैरे गावांतील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दिमनीतील जातीय समीकरणांमुळे इथली लढाई रंगतदार झाली असून केंद्रीयमंत्री नरेंद्र तोमर यांना विजय मिळवायचा असेल तर त्यांच्याकडील राजकीय शहाणपण उपयुक्त ठरेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the chambal valley one of cm candidate narendra singh tomar future is on stake print politics news asj
Show comments