ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच, या मतदार संघाशेजारीच असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी- पाचपखाडी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांचे भावी आमदार असे पोस्टर झळकू लागले आहेत. यानिमित्ताने भाजपने एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावरच दावा केल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे शहर, कोपरी -पाचपखाडी ओवळा- माजीवडा, कळवा- मुंब्रा आणि कल्याण ग्रामीणचा काही भाग असे पाच विधानसभा मतदारसंघ येतात. यातील ठाणे शहर, कोपरी -पाचपखाडी ओवळा- माजीवडा हे तीन मतदारसंघातून आजवर शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. यातील कोपरी पाचपखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीनदा निवडून आले आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर हे तीनदा निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत इथे उमेदवार बदलला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने शिंदेच्या सेनेने या मतदारसंघावर दावा केला होता. परंतु ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला गेला असून येथून भाजपने विद्यमान आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊ केल्याने महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर हे बंडाचे निशाण हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच त्या शेजारील कोपरी- पाचपखाडी मतदारसंघातही बंडाचे वारे वाहू लागले आहे.

हेही वाचा – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी डोंबिवलीत

मुख्यमंत्री शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांचे भावी आमदार असे पोस्टर झळकू लागले आहेत. दादाचं काम बोलतंय, भावी आमदार, पर्व विकासाचे…जनतेच्या विकासाचे, मनामनात घराघरात भरत चव्हाण, असा मजकूर पोस्टरवर असून हे पोस्टर समाजमध्यमांवर प्रसारित होऊ लागल्याने शिंदेच्या सेनेत अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी भागातील प्रभागातून भरत चव्हाण हे राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून सुरुवातीला निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. यापूर्वीही चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी दंड थोपटले होते आणि नंतर तलवार म्यान केली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चव्हाण यांनी बंडखोरी केल्यास शिंदेच्या सेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांच्या पत्नीला, उमेदवारी दिल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दावा केला होता, त्याचप्रमाणे आम्ही कोपरी मतदारसंघावर दावा केला आहे. या मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी स्वतः इच्छुक आहे. परंतु पक्ष जो निर्णय घेईल, त्यानंतर आम्ही भूमिका ठरवू. तसेच मुख्यमंत्री राज्याचे असल्याने ते इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. – भरत चव्हाण, भाजप माजी नगरसेवक