लाट नसलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेश व राजस्थानमधील शेखावटी भागातील मतदारसंघांमध्ये भाजपच्या राजकीय कौशल्याची कसोटी लागेल. या दोन्ही विभागांमध्ये प्रभावशाली जाट आणि ठाकूर मतदार भाजपचा डाव बिघडवण्याची शक्यता असली तरी, मायावतींच्या ‘बसप’चे मुस्लिम उमेदवार भाजपसाठी तारणहार ठरू शकतील.
काही दिवसांपूर्वी राजपुतांच्या महापंचायतीमध्ये भाजपविरोधात मतदानावर सहमती झाली होती. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुझ्झपूरनगरमध्ये केंद्रीयमंत्री संजीव बालियान आणि भाजपचे आमदार संगीत सोम यांच्यातील वाद मिटलेला नाही. ठाकुरांनी बालियानविरोधात मतदान केले तर काँग्रेस व ‘बसप’च्या मुस्लिम उमेदवारांमधील मतविभागणीच बालियान यांचा बचाव करू शकते. सहानरपूर, कैराना, बिजनौर या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे. इथे प्रामुख्याने जाट मतदार २०१९ मध्ये भाजपसोबत राहिले होते. यावेळी जाट मतदार लांब राहिले तर भाजपला मोठा फटका बसू शकतो. वरूण गांधींना नाकारून ‘पीलभीत’मध्ये भाजपने पूर्वाश्रमीचे काँग्रेसी जितीन प्रसाद यांना उमेदवारी दिल्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली आहे.
हेही वाचा – “यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा
शेखावटीत भाजपला धक्का?
राजस्थानमध्ये नागौर हा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख हनुमान बेनिवाल यांचा गट असून चुरू, झुंझुनू, सिकर हे शेखावटी प्रदेशातील चारही मतदारसंघ जाटबहुल आहेत. २०१९ मध्ये ‘एनडीए’मध्ये सामील झालेले बेनिवाल आता काँग्रेससोबत आहेत. यावेळी शेखावटीतील जाट मतदारांनी भाजपला धक्का देण्याचे ठरवले तर इथल्या सर्व मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत होऊ शकते. गेल्या वेळी राजस्थानमधील सर्वच्या सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या पण, यावेळी शेखावटी प्रदेश भाजपसाठी आश्चर्यकारक निकाल देऊ शकतात. अलवरमध्ये केंद्रीयमंत्री व भाजपचे दिग्गज नेते भूपेंदर यादव यांचे राजकीय भवितव्य निश्चित होईल.
कोईम्बतूर लढत प्रतिष्ठेची
तामीळनाडूमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई या दोघांनी मिळून भाजपच्या भगव्या झेंड्याला चर्चेत ठेवले आहे. कोईम्बतूरमधून अन्नमलाई निवडणूक लढवत असून तिथे द्रमुक, अण्णाद्रमुक आणि भाजप अशी तिहेरी लढत होणार असून अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. २०१४ मध्ये कन्याकुमारीची जागा भाजपचे पी. राधाकृष्णन यांनी जिंकली होती. २०१९ मध्ये काँग्रेसचे विजय वसंत विजयी झाले होते. यावेळीही हेच दोन प्रतिस्पर्धी शड्डू ठोकून उभे आहेत. ही जागा ‘द्रमुक’ने काँग्रेसला दिली असून इथे काँग्रेस, भाजप आणि अण्णाद्रमुक अशी तिहेरी लढत होईल. रामनाथपूरममध्ये अण्णाद्रमुकच्या आजी-माजी नेत्यांमध्ये प्रमुख लढाई असेल. माजी मुख्यमंत्री व अण्णाद्रमुकचे तत्कालीन नेते ओ. पनीरसेल्वम (ओपीएस) अपक्ष लढत असून त्यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे.
छिंदवाडा, उधमपूर, जमुईकडेही लक्ष
मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ लढत आहेत. तिथे काँग्रेसचे स्थानिक नेते- कार्यकर्त्यांची फळी भाजपमध्ये सामील झाली असून कमलनाथ व नकुलनाथ यांचीही चर्चा झाली होती. इथे उलटफेर झाला तर काँग्रेसच्या गडावर भाजपचा कब्जा होईल. जम्मू-काश्मीरचा विशेषाधिकार काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच इथे लोकसभेची निवडणूक होत असून उधमपूर हा जम्मू विभागातील मतदारसंघ आहे. हा विभाग भाजपचा गड मानला जातो. इथून केंद्रीयमंत्री व भाजपचे नेते जितेंद्र सिंह पुन्हा लढत आहेत. बिहारमध्ये जमुईमधून सलग दोनवेळा विजयी झालेले लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी यावेळी मेव्हणा अरुण भारती यांना उभे केले आहे. पासवान पुन्हा ‘एनडीए’मध्ये सामील झाले असून बिहारमधील निवडणूक प्रचाराचा नारळ मोदींनी इथून फोडला होता.
लक्षवेधी लढती
पहिल्या टप्प्यामध्ये १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशामध्ये १०२ जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यापैकी काही लढती लक्षवेधी ठरू शकतील.
० उत्तरप्रदेशः सहारनपूर, कैराना, मुझ्झपूरनगर, मुराबाद, रामपूर, पीलभीत ० आसामः दिब्रूगढ ० छत्तीसगढः बस्तर ० जम्मू-काश्मीरः उधमपूर ० मध्य प्रदेशः छिंदवाडा ० तामीळनाडूः कोईम्बतूर, रामनाथपूरम, कन्याकुमारी, चेन्नई दक्षिण, थुट्टूक्कुडी ० मणिपूरः इनर मणिपूर, आऊटर मणिपूर ० राजस्थानः चुरू, झुंझुनू, सिकर, नागौर, अलवर ० बिहारः जमुई