संतोष प्रधान
देशातील बहुतांशी राज्यांमध्ये काँग्रेससह विविध पक्षांमधील लोकप्रतिनिधी व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कल असताना ईशान्येकडील त्रिपूरा राज्यात मात्र उलटे चित्र बघायला मिळते. कारण सत्ताधारी भाजप आघाडीतील आठ आमदारांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. राजीनामे दिलेल्या आमदारांनी काँग्रेस किंवा नव्याने स्थापन झालेल्या पक्षात प्रवेश केला आहे.
हेही वाचा… औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादी कायम राखणार का ?
महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेशमधील काँग्रेस किंवा मित्र पक्षांची सरकारे पक्षांतरामुळे गडगडली. कर्नाटक आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचे आमदार फुटले होते. त्रिपूरात मात्र नेमके उलटे चित्र बघायला मिळते. भाजपच्या चार तर मित्र पक्ष आयपीएफटी पक्षाच्या चौघांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. त्रिपूरात विधानसभेची मुदत येत्या फेब्रुवारीत संपुष्टात येत आहे. निवडणुकीपूर्वी आमदारांच्या पक्षांतराचा मोसम सुरू झाला आहे. फक्त फरक एवढाच आहे की देशाच्या अन्य भागाच्या विरोधात त्रिपूरातील वातावरण आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत आमदार काँग्रेस किंवा नव्याने स्थापन झालेल्या पक्षात प्रवेश करीत आहेत.
हेही वाचा… नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कोणाला उमेदवारी ?
त्रिपूरात २०१८ मध्ये डाव्यांची सत्ता उलथवून भाजप सत्तेत आला. तेव्हा विरोधात असलेल्या काँग्रेसमधील अनेक आमदारांना भाजपने गळाला लावले होते. भाजपमधील अंतर्गत राजकारणात हे आमदार स्थिरस्थावर झाले नाहीत. पक्षांतर्गत असंतोष लक्षात घेऊनच मध्यंतरी त्रिपूरात विप्लब देब यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात आले. तरीही आमदारांमधील नाराजी कमी झालेली दिसत नाही. सत्ताधारी आघाडीचे आठ आमदार वेगळा विचार करतात याचाच अर्थ भाजपसाठी सारे काही आलबेल नाही हेच स्पष्ट होते.