नुकत्याच हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पसमांदा (मागासवर्गीय) मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाला सर्व समाजातील वंचित आणि दलित घटकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विकासाला गती मिळू शकते अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. विशेषत: उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात भाजपाच्या विरोधात मतदान करतो. ही पक्षासाठी निश्चितच चिंतेची बाब असल्याचं मत भाजपाच्या नेत्यांनी मांडले आहे.
उत्तर प्रदेश भाजपाकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पक्षासारखा मजबूत प्रमुख विरोधी पक्ष आहे. समाजवादी पक्ष आणि इतर ओबीसी पक्षांची मजबूत युती आहे. असं असतानाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुमारे आठ टक्के मुस्लिम मतदारांनी भाजपाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे पसमंडा मुस्लिमांचा पाठिंबा मिळण्याची पक्षाची आशा वाढली आहे. बाराबंकी जिल्ह्यातील एका सपा उमेदवाराने पसमंडा मुस्लिमांची मते भाजपकडे वळवल्याचे सांगत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की ” ही मते भाजपाकडे जात आहेत ही चिंतेची बाब आहे. याबाबत पक्षाने मला या समाजातील लोकांशी बोलण्यास सांगितले होते. जेव्हा मी पसमंडा मुस्लिमांच्या गावात पोहोचलो तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले की त्यांना घरे, मोफत रेशन, शौचालये, एलपीजी सिलिंडर, कमी किमतीच्या वैद्यकीय सुविधा या गोष्टी भाजपा सरकारच्या काळातच मिळाल्या आहेत. इतर पक्षांनी या सुविधा त्यांच्यापर्यंत कधीही पोहोचवल्या नाहीत. मी त्यांना समाजवादी पक्षाला मत देण्याची विनंती केली आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. त्या समजतील लोकं कमी शिकलेली आहेत त्यामुळे त्यांच्यावर अशा योजनांचा प्रभाव पडला जास्त पडला”. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ पुन्हा सत्तेत आल्यानंतर नवीन मंत्रिमंडळात पसमंडा मुस्लिम समाजातील असणाऱ्या दानिश आझाद अन्सारी यांचा समावेश केला. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील ते एकमेव मुस्लिम मंत्री आहेत.
उत्तर प्रदेश भाजापाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष कुंवर बासित अली म्हणाले की “राज्यात चार कोटी पसमंडा मुस्लिम आहेत. त्यांना मोदी सरकारच्या तसेच आदित्यनाथ सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला आहे पण पक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या भाजपाला या समाजातील लोकांची हवी तशी मते मिळवता आली नाहीत. राज्यातील भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चामध्ये ७० टक्क्यांहून अधिक कार्यकर्ते पसमंडा मुस्लिम समाजातील आहेत”.
यूपीस्थित सामाजिक संस्था पसमंडा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष अनिस मन्सूरी म्हणाले की, उत्तर प्रदेशात पसमंडा मुस्लिम समाज समाजवादी पक्षाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देतात. मागील अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात मन्सूरी यांना राज्यमंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर ते बसपमध्ये सामील झाले पण नंतर ते पुन्हा समाजवादी पक्षामध्ये परतले. पसमंडा मुस्लिमांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरुक करणे आवश्यक आहे, असा दावा त्यांनी केला आहे.