उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या २ जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रामपूर आणि आझमगड या दोन्ही मतदार संघात समाजवादी पक्षाचा पराभव झाला आहे. हे दोन्ही मतदारसंघ समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. या निवडणुकीच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही मतदार संघात सभा घेतली होती. भाजपाने दोन्ही मतदार संघात पूर्ण ताकद लावली असताना अखिलेश यादव मात्र प्रचारापासून दूर होते. आझमगडमध्ये बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) दमदार कामगिरीने समाजवादी पक्षाचा पराभव झाला आहे. दोन्ही पोटनिवडणुका जिंकून भाजपने आगामी सर्व निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरसुद्धा त्यांचे वर्चस्व असल्याचे दखवुन दिले आहे.
सत्ताधारी भाजपाने उत्तर प्रदेशातील विरोधी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर समाजवादी पक्षाची लोकसभेतील संख्या कमी झाली आहे. आता समाजवादी पक्षाच्या खासदारांची संख्या तीन आहे. या पराभवामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. या निवडणुकीत आझमगड येथून अखिलेश यादव यांचा चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणारा रामपूर हा मतदारसंघ आता भाजपच्या ताब्यात आहे. आझमगडमध्ये बीएसपीचा पराभव झाला असून रामपूर मतदार संघात बीएसपीने उमेदवार दिला नव्हता. अखिलेशप्रमाणे मायावतीही प्रचारापासून दूर राहिल्या. भाजपाने प्रचारात आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती.
आझमगड
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही सपाने मतदारसंघ जिंकला होता. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीतही आझमगडमधील पाचही विधानसभा मतदारसंघ समाजवादी पक्षाने जिंकले होते. पण यावेळी हा मतदारसंघ भाजपाने जिंकला आहे. भाजपाच्या दिनेश लाल यादव यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र या पोटनिवडणुकीत ते भाग्यवान ठरले. आझमगड मतदार संघात एकूण १८ लाख मतदार आहेत. यामध्ये दलित, मुस्लिम आणि यादव समाजाचे वर्चस्व असल्यामुळे सपा आणि बसपा हे दोन प्रमुख दावेदार मानले जात होते. या पोटनिवडणुकीत एसपीच्या मतांचा वाटा ६०.३६ टक्क्यांवरू ३३.४४ टक्क्यांवर घसरला आहे.
रामपूर
रामपूर हा मतदारसंघआझम खान यांचा बालेकिल्ला मानला जात होता. समाजवादी पक्षाचा विजय निश्चित आहे हे गृहीत धरून रामपूरमध्ये दिग्गज नेते आणि त्यांच्या समर्थकांनी प्रचारावर फारसे लक्ष दिले नाही. परंतु नेमका याचाच फायदा घेत भाजपाने समाजवादी पक्षाच्या बालेकिल्याला खिंडार पाडले.भाजपाने रामपूरमध्ये १६ राज्यमंत्र्यांची फौज उभी केली होती. रामपूरमध्ये जवळपास ५२ टक्के मतदार मुस्लिम आहेत. मतदानाचा वाढलेला टक्का आणि समाजवादी पक्षाचा अति आत्मविश्वास या दोन गोष्टींमुळे भाजपाला रामपूर जिंकण्यात यश आले.